हाऊसफुल्ल – वडील-मुलीच्या नात्याचं खास मीडियम

6659

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

दैनंदिन आयुष्याशी अतिशय जवळचा असणारा आणि हलकाफुलका असा विषय पाहायला कोणाला आवडत नाही? त्यात हिंदी मीडियमने मिळवलेलं यश आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर अंग्रेजी मीडियमकडे सगळ्यांच्या उत्सुक नजरा लागणं साहजिकच आहे, पण जेव्हा अपेक्षा असतात तेव्हा प्रेक्षकांच्या मनात आधीच एक आकृतिबंध तयार झालेला असतो आणि त्या तयार आकृतिबंधापेक्षा वेगळं समोर आलं की, अपेक्षाभंग झाल्यासारखं वाटतं. तसंच काहीसं ‘अंग्रेजी मीडियम’ सिनेमाचं झालं आहे. उत्तम विषय, खणखणीत अभिनय या गोष्टी असल्या तरीही प्रेक्षकांच्या अपेक्षांमध्ये हा सिनेमा कमी पडतो आणि मग हिंदी मीडियम कसा अधिक सरस होता या तुलनेने आपण मनातल्या मनात सिनेमाचं वर्गीकरण करून टाकतो.

ही गोष्ट आहे राजस्थानमध्ये राहणाऱया चंपकची. चंपक अर्थात इरफान खान हा राजस्थानमधील घसिटाराम या नामांकित हलवायाचा नातू आहे. त्याचं जे भलंमोठं कुटुंब आहे, त्यात हे नाव वापरण्यावरून कोर्ट कारवाई सुरू आहे, पण गंमत म्हणजे हे कुटुंब कागदोपत्री भांडत असले तरी प्रत्यक्षात मात्र एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत. चंपक विधुर असून त्याने आपल्या लाडक्या तारिणी नावाच्या मुलीला एकटय़ाने लहानाचं मोठं केलं आहे. तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण करायला तो तत्पर असतो. दोघांमध्ये एक वेगळंच नातं आहे. तारिणीचं स्वप्न आहे लंडनला जाऊन पुढचा अभ्यास पूर्ण करायचं आणि ते स्वप्न आपण पूर्ण करायचंच असा निश्चय चंपक करतो, पण मग त्यासाठी त्याला काय काय करावं लागतं? हे स्वप्न पूर्ण होतं का ? झालं तर ते कसं होतं? हे सगळं जाणून घेण्यासाठी ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा पाहायला हवा.

प्रदीर्घ आजारपणानंतर इरफान खान पुन्हा एकदा पडद्यावर आला असून त्याचा वावर तितकाच खणखणीत आहे. किंबहुना, इरफानला परत एकदा सिनेमात पाहताना मस्त वाटतं. सिनेमाला आकार देताना त्याची अदाकारी हे सगळ्यात मोठं शक्तिस्थळ आहे. इरफानच्या मुलीची भूमिका करणारी राधिका मदन ही अभिनेत्रीदेखील उत्तम. टवटवीत वावर, हसरा चेहरा आणि सहजपणा या भूमिकेसाठी चपखल बसतो. विशेष म्हणजे तिच्यात आणि इरफानमध्ये जे रसायन जुळून येतं ते खास आहे. दीपक डोब्रियाल हा उत्तम अभिनेता आहे आणि एखादं विशेष कॅरॅक्टर तो तितक्याच खास पद्धतीने साकारू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध होतं. करीना कपूरच्या वाटय़ाला आलेली भूमिका अगदीच छोटी आहे. म्हणजे तिने ही भूमिका का स्वीकारली असावी? असा प्रश्न आपल्या मनात हमखास उमटतो, पण लहान असली तरी त्या भूमिकेला काहीएक वजन आहे आणि त्यामुळे ती लक्षात राहते हे खरं. एकूण अभिनयाच्या पातळीवर हा सिनेमा खमंग झालाय खरा, पण तरीही त्यात काहीतरी कमी आहे असं मात्र सिनेमा पाहताना वाटत राहतं .

म्हणजे हिंदी मीडियम आणि या सिनेमाची गोष्ट एकमेकांपेक्षा खूपच वेगळी असली तरी हिंदी मीडियममध्ये जी एक पक्की पार्श्वभूमी होती ती या सिनेमात कुठेतरी हरवल्यासारखी वाटते. या सिनेमात कोर्ट केस, आपापसातले वाद किंवा तत्सम अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टी आहेत. त्यामुळे सिनेमा कदाचित थोडा विस्कळीत झाला असावा असं वाटतं. दुसऱया अर्ध्या भागात जे मुलीला लंडनला पोहोचवण्याचे प्रयत्न आहेत, ते उगाच ताणल्यासारखे वाटतात आणि त्यामुळे सिनेमाची सहजता डळमळीत होते.

मुळात या सिनेमात खूप क्षमता होती, गोष्टीत करण्यासारखं खूप काही होतं, पण प्रत्यक्षात मात्र ते तसं उतरलं नाही हेच दुर्दैव! पण तरीही करमणुकीसाठी हा सिनेमा पर्याय म्हणून नक्कीच निवडता येईल. सिनेमा संपल्यावर अपेक्षा पूर्ण झाल्यासारख्या वाटल्या नाहीत तरी चेहऱयावर छान हसू मात्र येतं. शिवाय इरफान खानला पुन्हा एकदा पडद्यावर पाहणं हा आनंद आहेच आणि वडील-मुलीमधील एक छान संवेदना या सिनेमाच्या निमित्ताने अनुभवायला काहीच हरकत नाही.

  • सिनेमा – अंग्रेजी मीडियम
  • दर्जा –
  • निर्माता – दिनेश विजन, ज्योती देशपांडे
  • दिग्दर्शक – होमी अदजानिया
  • लेखक – भावेश मांडलिआ, गौरव शुक्ला, विजय चावल, सारा बोडीनार
  • संगीत – सचिन – जिगर, तनिष्क बागची
  • कलाकार – इरफान खान, करीना कपूर-खान, राधिका मदन, दीपक डोबलियार, डिंपल कपाडिया, रणवीर शौरी
आपली प्रतिक्रिया द्या