एका कर्मयोद्ध्यांच्या कार्याचे सिंहावलोकन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 >> श्रीकांत आंब्रे

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी त्या पदावरून पायउतार होण्याच्या सुमारास लखनौत त्यांच्या तोपर्यंतच्या राजकीय, सामाजिक वाटचालीचा, लोकसेवेचा, त्यातून मिळालेल्या आनंदाचा, वाट्याला आलेल्या सुखदुःखाचा प्रदीर्घ वेध घेणारे ‘चरैवेति । चरैवेति।।’ हे आत्मनिवेदनात्मक पुस्तक लिहिले. सुरुवातीला पाच भाषांमधील हे पुस्तक खूप लोकप्रिय झाले. ते वाचून प्रभावित झालेल्या अनेक नामवंतांच्या त्या पुस्तकावरील प्रदीर्घ लेखांचे दुसरे पुस्तक ‘कर्मयोद्धा राम नाईक’ हे शीर्षक देऊन प्रसिद्ध करावे, असा आग्रह राम नाईक यांचे जिवलग मित्र वकार रिझवी यांनी धरला. त्यांच्या इच्छेमुळेच या दुसऱ्या पुस्तकाचे बीज त्यांच्या मनात रुजले. मात्र ते पुस्तक छपाईला जाण्यापूर्वीच वकार रिझवी यांचे ‘कोरोना’मुळे निधन झाले. तरीही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाईक यांनी पुस्तकाचे काम मार्गी लावले आणि हे पुस्तक हीच माझी त्यांना श्रद्धांजली असा अर्पण पत्रिकेत त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून त्यांना ते अर्पण केले.

राम नाईक आपला मध्यमवर्गीय नोकरीचा पेशा सोडून राजकारणात आले आणि तिथेच स्थिरस्थावर झाले. सतत लोकांचे प्रश्न सोडवण्यावर त्यांनी भर दिला. विनम्र स्वभाव, दांडगा जनसंपर्क, माणसे जोडण्याची हातोटी, दुसऱ्यांच्या समस्या जाणून त्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची धडपड, सामाजिक प्रश्नांची जाण, आक्रस्ताळेपणा न करता शांतपणे आणि सौहार्दाने आपले विचार ठामपणे मांडण्याची शक्ती, वडील तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक दामोदर वामन कुलकर्णी ऊर्फ नाईक मास्तर, सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष पं.दीनदयाळ उपाध्याय, भाजपचे संस्थापक अध्यक्ष भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे तत्कालीन अध्यक्ष व उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर असल्यामुळे त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांची राजकीय, सामाजिक वाटचाल झाली. हे नेते त्यांचे प्रेरणास्थान आणि आदर्श होते. पत्नी पुंदा, पत्रकार कन्या विशाखा कुलकर्णी-नाईक तसेच निशिगंधा या घरच्या मंडळींनीही त्यांना त्यांच्या कार्यात मोलाची साथ दिली.

पाच वेळा उत्तर मुंबईचे खासदारपद, तीन वेळा आमदारपद, रेल्वेचे राज्यमंत्रीपद आणि उत्तर प्रदेशचे राज्यपालपद भूषवूनही त्यांचे पाय सदैव जमिनीवरच राहिले. ‘चरैवति।चरैवति।। या त्यांच्या आत्मकथावजा पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ सांगताना ते म्हणतात, चरैवति।चरैवति।। म्हणजे सतत पुढे चालत राहणे… त्यामुळेच जीवनात सफलता प्राप्त होते. सतत कार्यरत राहण्याच्या वृत्तीचे ते प्रतीक आहे. या वाटचालीत मला मनापासून साथ देणारे असंख्य सहकारी, हितचिंतक मिळाले. ही साथ नसती तर या उंचीवर पोहोचणे अशक्य होते. ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे काही नेते आहेत, त्यात त्यांची गणना होते. त्यांची विधानसभा, लोकसभेतील अभ्यासपूर्ण भाषणे, जनतेच्या समस्यांचा अभ्यास करून त्यासाठी आंदोलने उभारणे, सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, सतत विधायक कामांचा पाठपुरावा करणे, त्यामुळेच ते सामाजिक कार्याचा विस्तार करू शकले. विजयाने हुरळणे नाही की पराभवाने खचणे नाही. सतत पुढे चालत राहणे हे व्रत त्यांनी स्वीकारले. त्यामुळेच ते यशस्वी वाटचाल करू शकले. महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. विविध सामाजिक आणि राजकीय दायित्व निभावताना त्यांनी जीवनाचा व्यापक आणि दीर्घ अनुभव घेतला. या अनुभवाचा अर्क वाचकांना या पुस्तकात अनुभवायला मिळेल.

कर्करोगावर यशस्वी मात करून ते पुन्हा कर्मयोद्ध्यांप्रमाणे समाजकार्याच्या ध्यासाने कार्यरत झाले. त्यांची दोन्ही पुस्तके त्यांच्या जीवनयात्रेच्या अनुभूतीची कहाणी आहे. त्यांच्या गतीशील जीवनयात्रेत अनेक अनुकूल, प्रतिकूल प्रसंग आहेत. साध्या कामगारापासून राजकारणातील सर्वोच्च नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या सान्निध्यातील अनेक प्रसंगांचे ते साक्षीदार आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणादायक ठरेल, असे त्यांचे कार्य आहे. संसदेत त्यांच्या ठरावामुळे अनेक विधायक योजना प्रत्यक्षात आल्या. उत्तर प्रदेशात राज्यपाल असतानाही त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. तेथील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. विधायक कामांना चालना दिली. त्यांच्या ‘चरैवेति।चरैवेति।।’ या पुस्तकाचे ब्रेल लिपीसह बारा भाषांमध्ये अनुवाद झाले. मधूर वाणी, शालीनता, कर्तृत्व, आचरण, द्वेष भावनेचा त्याग यामुळे समाजात बंधुभावाचे वातावरण निर्माण करू शकतो यावर त्यांचा विश्वास आहे, ते त्यांच्या कर्तृत्वातून जाणवते.

उत्तर प्रदेशचे ते 27 वे राज्यपाल, परंतु कोणत्याही राज्यपालापेक्षा आपली छाप उमटवून जाणारे ते पहिले राज्यपाल असे तेथील सामान्य जनता आजही म्हणते यातच सारे आले. जनसंपर्क आणि साधेपणामुळे ते लवकर लोकप्रिय झाले. त्यांचा स्वभाव राजकारणापेक्षा जनसेवेचा आहे असे डॉ. अम्मार रिझवी आपल्या लेखात म्हणतात. ‘कर्मयोद्धा राम नाईक’ या पुस्तकात राम नाईक यांचा संक्षिप्त परिचय व त्यांचे मनोगत व ग्रंथसंपदा प्रकाशक वकार रिझवी व ‘चरैवेति।चरैवेति।।’ या पुस्तकाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. अम्मार रिझवी यांचे विचार अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांनी त्या काळी राम नाईक यांच्या कर्तृत्वाचा केलेला गौरव, मुंबईतील पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्याचा वृत्तांत, त्यातील देवेंद्र फडणवीस यांचे विचार, 9 नोव्हेंबर 2016 मध्ये नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात व हिंदुस्थानात विविध राज्यांत झालेल्या ‘चरैवति। चरैवति।।’च्या गुजराती, इंग्रजी, उर्दू अनुवादाच्या लोकार्पण सोहळ्याला प्रणव मुखर्जी, मोहम्मद अन्सारी, सुमित्रा महाजन, एम. वेंकय्या नायडू, शरद पवार, अखिलेश यादव, रामनाथ कोविद, प्रकाश जावडेकर, मुख्तार अब्बास नकवी, नजमा हेपतुल्ला, सी. विद्यासागर राव, डॉ. विनय सहस्रबुद्धे, प्रो. जगदीश मुरवी, योगी आदित्यनाथ उपस्थित होते. त्यांनी तसेच अनेक उर्दू भाषिक नामवंतांनी त्या त्यावेळी झालेल्या प्रकाशन सोहळ्यांमध्ये केलेली ‘चरैवेति। चरैवेति।।’ पुस्तकावर केलेली विस्तृत भाष्ये या नव्या पुस्तकात आहेत. हिंदी भाषेतील या पुस्तकाला राम नाईक गौरव ग्रंथाचे स्वरूप आले असले तरी त्यांच्या जीवनकार्याचाच हा गौरव आहे. खऱया अर्थाने कर्मयोद्धाची ही कहाणी प्रेरणादायक आहे. हिंदुस्थानात विविध राज्यांत झालेल्या ‘चरैवेति। चरैवेति’च्या जर्मनसह ब्रेल व इतर हिंदुस्थानी भाषांमध्ये झालेल्या अनुवादाच्या लोकार्पण सोहळ्याची आकर्षक रंगीत छायाचित्रेही पुस्तकात आहेत. तसेच या पुस्तकाला मिळालेल्या अनेक पुरस्कार समारंभांची छायाचित्रेही आहेत. सजावट, मांडणी उत्तम आहे.

कर्मयोद्धा राम नाईक
लेखक : राम नाईक
प्रकाशक : आनंद लिमये, इंपिंग इनोव्हेशन्स
पृष्ठ : 245, मूल्य : रुपये 1200/-