
>> श्रीकांत आंब्रे
गोव्याच्या निसर्गरम्य माशे गावातील एका सामान्य, पण सुखवस्तू कुटुंबातील एक हुशार तरुण इंजिनीअर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून गुजरातमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतो, नोकरीसाठी वणवण भटकतो, मुंबईत येऊन सबमर्सियल पंप बनविणाऱया कंपनीत नोकरी मिळवतो, ती नोकरीही सोडून स्वतः लहानशी शेड घेऊन स्वतःची कंपनी स्थापन करतो. तिथेही सबमर्सियल पंप आणि पाण्यासंबंधीचे पूरक उद्योग सुरू करून ‘अगस्ती इंडस्ट्रीज’चा मालक म्हणून नावारूपाला येतो आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून देशात, परदेशात कीर्ती मिळवतो. हे सारंच स्वप्नवत वाटलं तरीही वस्तुस्थिती असते. या क्षेत्रातील हे यशस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीरंग प्रभू. 50 वर्षे या उद्योगात पाय रोवून उभे राहिल्यावर आज सत्तरी ओलांडल्यावर जीवनाकडे मागे वळून पाहताना त्यांना आपले अनुभव इतरांनाही प्रेरक ठरावेत म्हणून आत्मचरित्राच्या रूपाने सांगावेसे वाटले तर नवल नाही. म्हणूनच त्यांनी ‘श्रीरंग- गोवा ते मुंबई व्हाया गुजरात’ हे आत्मचरित्र लिहिलं आहे.
श्रीरंग प्रभूंचं जीवन गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांतील वास्तव्याने समृद्ध झालं आहे. मुळातच त्यांचे अंगभूत गुणच त्यांच्या उत्कर्षाचं कारण आहे. प्रामाणिकपणा, स्वतःकडे तटस्थपणे पाहण्याची वृत्ती, मूल्याधिष्ठत जीवनक्रम, व्यवसायातील सचोटी, समाजाकरिता काही करण्याची तळमळ, गुणग्राहकता आणि आत्मप्रौढीचा अभाव यामुळे त्यांची स्वतःची एक जीवनदृष्टी बनली आणि तिनेच त्यांचा यशस्वी जीवनाचा मार्ग सोपा केला.
लेखकाचं हे आत्मचरित्र केवळ वाचनीय नाही तर तरुणांनाही त्यातून बोध घेऊन बरंच काही शिकता येईल असं आहे. तत्त्व आणि व्यवहार यांची सांगड कशी घालावी, व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकी यांची मोट कशी बांधावी व का बांधावी याचा हा आदर्श वस्तुपाठ आहे. त्यांचं जीवन कदाचित एक यशस्वी उद्योजक एवढय़ापुरतंच मर्यादित राहिलं असतं, पण त्याला ‘रोटरी’चा स्पर्श झाला आणि त्यांचे सर्व आयाम बदलले. त्यांच्या जीवनाला एक समाजाभिमुखता आली. अन्यथा ते एका सुशेगात गोयंकार किंवा आत्मसंतुष्ट महाराष्ट्रीय राहिले असते, पण त्यांच्या समाजकार्यामुळे त्यांना एक व्यापक परिमाण प्राप्त झालं. अनेक सेवाभावी संस्थांना, व्यक्तींना त्यांनी आर्थिक मदत दिली. मुंबईतील एका रोटरी क्लबचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व घटकांसाठी भरीव काम केलं. शंभर अपंगांना ‘जयपूर फूट’चं वाटप, मोफत वैद्यकीय शिबिरे, नेत्रशिबिरे, मोठमोठे सेवा प्रकल्प यातून आपल्या पदाचा वापर समाजातील सर्व थरांतील घटकांसाठी केला. या आत्मचरित्रातील त्यांच्या गावाचं, परिवाराचं, शिक्षण, नोकरी आणि स्वतःच्या उद्योग- व्यवसायाचं, समाजकार्याचं, जगभर केलेल्या भटकंतीचं वर्णन इतक्या सहजसोप्या पद्धतीने आणि जिव्हाळय़ाने ते करतात की, एखाद्या कादंबरीतील प्रकरणं आपण वाचत आहोत असं वाटतं. गोयंकार असून मांसाहार न करणाऱया या माणसाचं जगच वेगळं आहे आणि ते तरुणांना प्रेरणादायक आहे.
श्रीरंग : गोवा ते मुंबई व्हाया गुजरात
लेखक : श्रीरंग प्रभू
प्रकाशक : लिपी प्रकाशन
पृष्ठ :176, मूल्य : रु. 150/-





























































