प्रदूषण नियंत्रण नियमांचं पालन न केल्यास कारवाई होणार, पालिकेचा बिल्डरांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत वाढतं प्रदूषण आणि त्यामुळे घसरलेला हवेचा दर्जा यांना नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कारवाई करायला सुरुवात केली आहे. शहरात सुरू असलेल्या बांधकामांवर आता पालिकेची नजर असणार आहे. त्याअनुषंगाने प्रदूषण नियंत्रणासंबंधींच्या नियमांचं उल्लंघन केल्यास बिल्डर आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.

मुंबईत प्रदुषणामुळे हवेचा दर्जा घसरला असून वायू गुणवत्ता मापकात सुधारणा करण्यासाठी अनेक ठेकेदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ही नोटीस पश्चिम मुंबईच्या पी नॉर्थ वॉर्डला पाठवण्यात आली आहे. यात मालाडचा भाग येत असून 97 खासगी आणि 27 सरकारी अशी अनेक 124 बांधकामं सुरू आहेत. यात रस्ते, पाण्याचे पाईप, पूल निर्माण अशा कामांचा समावेश आहे.

गेल्या आठवड्यातही पालिकेने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. त्यात बिल्डर आणि ठेकेदारांना बांधकामाच्या ठिकाणी तुषार सिंचन आणि फॉगिंग मशिनचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांना ते बसवण्यासाठी एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत वायू प्रदुषणासंबंधी नियमांचं पालन करण्याचे आदेशही पालिकेने दिले आहेत.