
सामना प्रतिनिधी । बोरी
बैलजोडी चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अब्दुल रहमान अब्दुल करीम कुरेशी यांच्या कौसडी येथील घराची बोरी पोलिसांनी रवीवारी रात्री झडती घेतली असता बैलाच्या चरबीचे 11 डबे आढळून आले. 11 बैलजोड्या चोरून त्याची कत्तल केल्याचे आरोपीने कबूल केले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी दिली. या प्रकरणी आणखी चार आरोपींना पोलिसांनी आज अटक केली असून यात चरबी तस्करीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रविवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या बैलजोड्या चोरीला गेल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी बोरी पोलीस ठाण्यात यावे, असे आवाहन पोलिसांनी समाज माध्यमातून केले होते. त्यानुसार बोरी सह कौसडी, कान्हड, कुपटा, पांगरी, मारवाडी कडसावंगी कोक, माक, शेक, पिंपरी रोहीला आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले होते. आपले चोरीला गेलेले बैल सापडतील या आशेने हे शेतकरी आले होते. खरीप हंगामातील पेरणी तोंडावर येऊन ठेपली आहे, त्यातच दावणीला बांधलेले बैलजोडी चोरट्यांनी लंपास केली. बाजारातून नवीन बैलजोडी खरेदी करण्यासाठी पैसे आणायचे कुठून? असा यक्षप्रश्न बैल जोडी चोरी झालेल्या शेतकऱ्यासमोर उभा आहे. आधीच दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांसमोर एक नवे संकट कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान, बोरी व परिसरातील जवळपास पंधरा बैलजोड्या चोरीस गेल्या असून आरोपींनी 22 बैलांची कत्तल केल्याची कबुली दिल्याने शेतकऱ्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच या निमित्याने बैलाच्या चरबीची तस्करी करणारी मोठी टोळी असल्याचे निष्पन्न झाले आहे. बोरी पोलिसांनी दहा डब्यात भरलेली बैलाची चरबी कुठे जाणार होती, याचा तपास लावून तस्करीखोरांना जेरबंद करावे, अशी मागणी पुढे आली आहे. पोलीसांनी बैलजोडी चोरांचा छडा लावल्याबद्दल शेतकऱ्यांनी बोरी पोलिसांचे कौतूक केले तर काही शेतकऱ्यांनी पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन बैलचोरट्यांचा शोध लावावा व अडचणीत सापडलेल्या पशुपालकांना निर्यात द्यावा, अशी मागणी केली.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली असून मंगळवारी सकाळी चार वाजता या प्रकरणातील आणखी चार आरोपी खदीर रशीद खान पठाण, एजाज रहेमान कुरेशी (रा. कौसडी) व राजू अबूशामा कुरेशी, अजहर अकबर कुरेशी रा. बोरी यांना अटक केली आहे. ही कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, पोलीस उपनिरीक्षक बि.व्ही. डोंगरे, जमादार पंचांगे, सानप, कटारे, पतंगे यांनी केली.




























































