माझ्या नराधम मुलाला जिवंत जाळा! आरोपीच्या आईचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
hyderabad-case

हैदराबादमधील वेटरनरी डॉक्टरवर सामूहिक बलात्कार, हत्या करून तिची ओळख पटू नये म्हणून तिचा मृतदेह जाळून गुन्हेगारांनी मानवतेला काळिमा फासला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघा गुन्हेगारांना फाशी द्या, जिवंत जाळा अशी मागणी देशभरातून होत असताना ‘माझा मुलगा नराधम निघाला, त्याने त्या दुर्दैवी मुलीवर बलात्कार करून तिला जाळले. तिला ज्या प्रकारे जाळले. त्याचप्रकारे माझ्या मुलालाही जिवंत जाळा’ अशी संतप्त प्रतिक्रिया अटकेत असलेल्या केशवुलू या आरोपीच्या आईने दिली.

वेटरनरी डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी सी. केशवुलू, जोलू शिवा, जोलू नवीन आणि मोहम्मद आरिफ या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील सी. केशवुलूची श्यामला ही आई आहे. ‘मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱया माझ्या मुलाला फाशी द्या किंवा जिवंत जाळा, माझी काही हरकत नाही. माझीही एक मुलगी आहे. त्यामुळे दुर्दैवी मुलीच्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवली असेल हे मी समजू शकते. माझ्या मुलाने बलात्कार करून तिची हत्या केली आहे हे माहीत झाल्यानंतरही जर मी त्याला पाठीशी घातले तर लोक आजीवन माझा द्वेष करतील’ अशी संतप्त प्रतिक्रिया श्यामलाने दिली. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर केशवुलूचे वडील घर सोडून निघून गेले आहेत. पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या केशवुलूला किडनी विकार असून दर सहा महिन्यांनी हैदराबादमधील रुग्णालयात उपचारासाठी नेले जाते, अशी माहिती त्याच्या आईने दिली.

बलात्कार-हत्याकांडानंतर आरोपी थेट घरी

जोलू शिवा आणि जोलू नवीन हे आरोपी गुडगांडला तर मोहम्मद आरिफ हा जकलैर गावात राहतो. पत्रकारांनीच या दुष्कृत्याची माहिती आरिफची आई मूलेबी हिला दिली. ‘त्या दिवशी आरिफ नेहमीप्रमाणे घरी आला. त्याच्या गाडीने एका मुलीला धडक दिली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. असा बनाव त्याने केला,’ असे ती म्हणाली. वडिलांनाही यातले काही माहीत नव्हते. ‘या दुष्कृत्याला जी योग्य शिक्षा असेल ती त्याला मिळालीच पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया आरिफच्या वडिलांनी दिली.

हद्दीचा वाद – तीन पोलीस निलंबित

साइबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी शमशाबाद पोलीस ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांकडून गुन्हा दाखल करून घेण्यात पोलिसांकडून झालेल्या हद्दीचा वाद आणि दिरंगाईप्रकरणी तिघा पोलिसांना निलंबित केले. मुलीचे नातेवाईक ज्या वेळी तक्रार नोंदवायला आले त्यावेळी हद्दीचे कारण देत पोलिसांनी त्यांना दुसऱया पोलीस ठाण्यात जायला सांगितले. पोलीस ठाण्याच्या हद्दीचा वाद झाला नसता तर मुलगी वाचली असती, असे पीडितेच्या आईने म्हटले आहे. गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली म्हणून उपनिरीक्षक एम. रवीकुमार, हेड कॉन्स्टेबल पी. वेणूगोपाल रेड्डी आणि हेड कॉन्स्टेबल ए. सत्यनारायण गौड यांना निलंबित करण्यात आले आहे.