नगरमध्ये 80 विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

ज्या शाळेत आपण शिकलो ती शाळा दप्तरमुक्त व्हावी व विध्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने तालुक्यातील मोहोज देव्हडे येथील प्राथमिक शाळेतील ८० विद्यार्थ्यांना सुमारे सहा लाख रुपये खर्चून मोफत टॅब देण्याचा अनोखा उपक्रम मोहोज देव्हडे येथील रहिवासी व सध्या पुणे येथे उद्योजक असलेल्या अनिल देव्हडे यांनी राबवला. त्यांनी दिलेल्या टॅब मधे शालेय उपक्रमात असलेल्या सर्व विषयांच्या धड्यांचा समावेश असून नवीन उपक्रम आल्यास त्याचा सुद्धा समावेश या  आधुनिक टॅबमध्ये करता येतो. देव्हडे यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे दप्तरमुक्त असलेली  मोहोज देव्हडे येथील जी.प. ची शाळा तालुक्यातील पहिली शाळा ठरली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की अनिल देव्हडे हे मूळचे तालुक्यातील मोहोज देव्हडे येथील रहिवासी असून सध्या ते पुणे येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत.  पुणे येथील बाजार समितीचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. आपल्या गावाचा त्यांना अभिमान असल्याने त्यांनी गावाशी आपली असलेली नाळ अजून तोडलेली नाही. गावात झालेल्या जलसंधारणेच्या कामांना यापूर्वी त्यांनी मोठा निधी सुद्धा दिला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे मोहोज देव्हडे येथील जी.प. च्या प्राथमिक शाळेत झाले असून ही  शाळा दप्तरमुक्त व्हावी, या उद्देशाने त्यांनी या शाळेतील पाचवी ते सातवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या ८० विद्यार्थ्यांना मोफत टॅब दिले आहेत. या टॅबमध्ये सर्व धड्यांचा समावेश करण्यात आला आहे. या शाळेत देव्हडे यांनी मोफत वायफाय सुविधा सुद्धा पदरमोड करत पुरवली असून जवळपास सहा लाख रुपये त्यांनी या उपक्रमासाठी खर्च केले आहेत.

आज या सर्व विद्यार्थ्यांना या टॅब चे प्रांताधिकारी देवदत्त केकाण,पो. निरी. रमेश रत्नपारखी,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,विस्तार अधिकारी शिवाजी कराड,माजी नगरसेवक डॉ. दीपक देशमुख यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. या सोहळ्यास ज्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले त्या विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी बोलताना अनिल देव्हडे म्हणाले कि मी ज्या शाळेत शिकलो  त्या शाळेतील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कुठेही कमी पडू नये ही आपली भावना आहे. गावासाठी राजकीय सोडून कोणतीही मदत आपण करण्यास आपण तयार असून या गावचा मी खूप ऋणी असल्याचे ते म्हणाले.