
सामना प्रतिनिधी । कवठे येमाई
केंदूर ता. शिरूर येथे थिटेवाडी बंधारा पाणी प्रश्नावरून आयोजित ग्रामसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत बंधाऱ्यात तातडीने पाणी सोडा अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात मंजूर केला.
केंदूर साठी पाणीप्रश्न नवा नाही. केंदूर ग्रामपंचायतीच्या वतीने आज सकाळी विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. विशेषत:अत्यंत जिव्हाळ्याच्या थिटेवाडी बंधारा पाणी प्रश्नावरून आयोजित या ग्रामसभेला गाव व वाड्या-वस्त्यांमधून मोठ्या संख्येने पुरूष-महिला ग्रामस्थ स्वयंस्फुर्तीने आवर्जून उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपापली मते मांडून अखेर “थिटेवाडी बंधाऱ्यामध्ये शासनाने लवकर पाणी सोडलेच पाहिजे; अन्यथा येत्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार, असा निश्चयाचा ठराव एकमताने टाळ्यांच्या कडकडाटात मंजूर केला. या ठरावामुळे अनेक छोट्या- मोठ्या पुढाऱ्यांचे धाबे दणाणणार आहेत.
गावातील पाण्याची अडचण दूर करण्यासाठी एक दिवस गावासाठी एक दिवस पाण्यासाठी म्हणून या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सर्व महिला वर्ग लहान थोर वयवृद्ध, तरुण वर्ग नियोजित ग्रामसभेला मोठया संख्येने हजर होते. सुरूवातीला ग्रामसेवकांनी सभेचा विषय मांडला. उद्योजक प्रमोद पऱ्हाड यांनी सभेला मार्गदर्शन करताना सांगितले की, अशी ग्रामसभा कधी झाली नाही. एवढ्या लोकांची उपस्थिती सभेला आज आहे. आणि जर नेते मंडळींनी गावाचा पाणी प्रश्न सोडविला नाही तर गाव मतदानावर बहिष्कार टाकेल. माजी सभापती सदाशिवराव थिटे म्हणाले की, सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन गावासाठी एकदिलाने काम करायला पाहिजे आणि पाणी प्रश्न सोडविला पाहिजे. युवराज साकोरे यांनी सभेला मार्गदर्शन करताना थिटेवाडी बंधाऱ्यामध्ये कसं पाणी आणलं जाईल किंवा गावा शेजारून वाहत असलेला चास कमानच्या कालव्यामधून कानिफनाथ उफसा योजना करून केंदूरचा निमा भाग ओलिताखाली कसा येऊ शकतो हे सविस्तर सांगितले. माजी उपसभापती राजेंद्र रासकर यांनी ओढा खोलीकरणचा मुद्धा उपस्थित केला. अंकुश पऱ्हाड, भरत साकोरे, तुकाराम थिटे, गोविंद साकोरे, भाऊसाहेब थिटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच वंदना ताठे, अध्यक्ष स्थानी उपसरपंच अभिजित साकोरे होते. दत्तामामा थिटे, संभाजी साकोरे, धोंडिभाऊ साकोरे, भासु तुकाराम सुक्रे, सुभाष, मंगेश गावडे, राजेंद्र ताठे, सर्जेराव डुकरे, माणिकराव शिर्के, बन्सी पऱ्हाड, मीनाताई साकोरे, सूर्यकांत थिटे, महादेव ताठे, आबासाहेब पऱ्हाड, उमेश साकोरे आदी ग्रामस्थ बहुसंख्यने उपस्थित होते.




























































