प्रदूषणाची कारणे शोधून काम करा,केवळ एअर प्युरिफायर म्हणजे जनतेच्या पैशांचा चुराडा;आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाचा समाचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील प्रदूषणाची कारणे शोधून त्यानुसार उपाययोजना करणे गरजेचे असताना आता ‘बेकायदा’ मुख्यमंत्र्यांनी पालिकेला ‘एअर प्युरिफायर’ बसवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी केवळ अशा प्रकारची ‘मलमपट्टी’ करणे म्हणजे जनतेच्या हक्काच्या पैशांचा चुराडा ठरेल, असा सणसणीत टोला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि पालिका प्रशासनाला लगावला आहे.

मुंबईत गेल्या महिनाभराहून हवेची गुणवत्ता घटल्याने वाढलेल्या प्रदूषणात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्यापपर्यंत कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना आमच्या काळात मुंबईचे प्रदूषण रोखण्यासाठी नियोजनबद्ध ‘क्लायमेट चेंज ऍक्शन प्लॅन’ आखून कार्यवाही सुरू केली होती. मात्र नव्या सरकारने हा उपक्रम बासनात गुंडाळल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारकडून मुंबईकरांच्या डोळ्यांत धूळफेक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

आमच्या काळातील कामे रोखली

महाविकास आघाडी सरकार असताना जनतेच्या हितासाठी निश्चित केलेले अनेक प्रकल्प ‘बेकायदा’ सरकारने महापौर नसल्याचा फायदा घेत जाणीवपूर्वक गुंडाळले असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यामध्ये हवामान कृती आराखडय़ासह, नियोजनबद्ध शहर विकास, सुरक्षित शाळा अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. मात्र पालिकेच्या जाहिराती, फलकबाजी आणि बोगस ‘टचअप’वर 1700 कोटींचा खर्च केला जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.