
विविध राज्यांतील कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक, शिक्षण विभागातील सचिवांच्या पार पडलेल्या बैठकीनंतर सीबीएसईची दहावीची परीक्षा रद्द करण्याचा तर बारावीच्या परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशभरात सीबीएसईची दहावीची परीक्षा 4 मे ते 7 जून तर बारावीची परीक्षा 4 मे ते 14 जून या कालावधीत होणार होती. परीक्षेसंदर्भात आज पार पडलेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला केंद्र सरकारचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे नुकसान होणार नाही याची सरकारच्या वतीने काळजी घेतली जाईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले. देशातील काही राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून 11 राज्यांतील शाळा, ज्युनियर कॉलेज बंद आहेत. अशा परिस्थितीत सर्व राज्यांमध्ये एकाचवेळी परीक्षा घेणे कठीण असून सध्याची स्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने सीबीएसईच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेतला आहे.
- 4 मे ते 14 जून या कालावधीत होणारी बारावीची परीक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. सीबीएसई बोर्डातर्फे कोरोना परिस्थितीचा 1 जूनला आढावा घेतला जाईल त्यानंतर परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. परीक्षा घ्यायच्या झाल्यास विद्यार्थ्यांना 15 दिवस आधी त्याविषयीच्या सूचना देण्यात येतील.
- 4 मे ते 7 जून या कालावधीत होणारी दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाकडून विकसित केल्या जाणाऱया मूल्यमापनाच्या पर्यायी निकषांद्वारे गुण देण्यात येतील. मिळालेल्या गुणांवर विद्यार्थी असमाधानी असल्यास परिस्थिती सुधारल्यानंतर या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.
- देशभरात सीबीएसई बोर्डाचे दहावीचे 21.5 लाख तर बारावीचे सुमारे 14 लाख विद्यार्थी आहेत.




























































