रुळांना थंडी बाधली…तीन ठिकाणी तडे गेल्याने ‘मरे’ विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

सतत कोणत्या ना कोणत्या कारणांनी विस्कळीत होणारी मध्य रेल्वे लागोपाठ तीन ठिकाणी रुळांना तडे गेल्याने बुधवारी विस्कळीत झाली. वातावरणात अचानक बदल झाल्याने रुळांना तडे जातात. मात्र ट्रान्सहार्बर आणि मेनलाइनवर दोन ठिकाणी अशा तीन ठिकाणी काही काळाच्या अंतराने तडे गेल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे सकाळी ऐन गर्दीच्या वेळी प्रचंड हाल झाले.

मध्य रेल्वेच्या शीव ते कुर्ला स्थानकांच्या दरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान रुळांना तडा गेला. त्यामुळे कल्याण दिशेला जाणाऱ्या लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे डाऊन जलद मार्गाची वाहतूक डाऊन धीम्या मार्गाने वळविण्यात आली. 8.30 च्या सुमारास रुळांची दुरुस्ती पूर्ण झाली तरीही लोकल गाडय़ांच्या वेगावर निर्बंध घातल्याने गाडय़ांची रखडपट्टी झाली. त्यानंतर वाशी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. 1 वर ट्रान्सहार्बर मार्गावर रुळांना सकाळी 8.20 वाजता तडा गेला. हा बिघाड स्थानकातच घडल्याने तो 8.28 वाजेपर्यंत तातडीने दुरुस्त करण्यात आला. तेवढय़ात मुलुंड ते ठाणे डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 9.05 वाजता रुळांना तडा गेला. हा बिघाड स. 9.25 वाजता दुरुस्त करण्यात आला.

कोल्हापूरचे तीनतेरा वाजले!

गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोल्हापुरात थंडीचा जोर वाढला असून पारा 13 अंशांपर्यंत खाली आला आहे. सकाळी सर्वत्र धुके पडत आहे. बुधवारी  पंचगंगा नदीचा घाट, पाण्यातील मंदिरे आणि दीपमाळा धुक्यात हरवून गेल्या होत्या.