ठरलं ! या तारखेला चंपाई सोरेन भाजपमध्ये सामील होणार

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन लवकरच भाजपमध्ये सामील होणार आहेत. 30 ऑगस्टला सोरेन अधिकृतरित्या भाजपमध्ये सामील होतील. सोरेन यांनी काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर हा निर्णय झाला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवर पोस्ट लिहून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 30 ऑगस्टला चंपाई सोरेन यांच्यासोबत झारखंड मुक्ती मोर्चाचे अनेक नेते भाजपमध्ये सामील होतील असेही सांगितले जात आहे.

आसामचे मुख्यमंत्री बिस्वा सरमा यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या प्रतिष्ठित आदिवासी नेते चंपाई सोरेन यांनी काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. रांचीत 30 ऑगस्टला सोरेन भाजपमध्ये सामील होतील असेही सरमा यांनी म्हटले आहे.

सोरेन हे वेगळा पक्ष स्थापन करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. तसेच त्यांचा पक्ष आणि भाजप युती करून निवडणूक लढवतील असेही सांगितले जात होते. पण आता सोरेन भाजपमध्ये सामील होणार असल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.