
शिक्षणकार्यासारखं पवित्र काम करणाऱ्या एका शिक्षकाने राजकीय कामात खंड पडू नये, यासाठी रोजंदारी माणूस ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे घुग्घुसचे तालुका शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे एका नावाजलेल्या शिक्षण संस्थेत शिक्षक आहेत. मात्र राजकारण करता यावं यासाठी बोढे यांनी आपल्या जागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे गिरवण्यासाठी चक्क रोजंदारी माणूस नेमला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्हातील सखरवाही येथील जनता विद्यालयात विवेक बोढे हे शिक्षक पदावर रूजू आहेत. बोढे हे भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. विविध राजकीय कार्यक्रमात बोढे सक्रिय असतात. या सक्रियतेत खंड पडू नये यासाठी बोढे यांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी चक्क रोजंदारी माणूस नेमला. बोढे यांच्या जागी हा रोजंदारी माणूस विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जायचा. हा गंभीर प्रकार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. या प्रकारावर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचे घुग्घुसचे तालुका शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांनी पत्रकार परिषदेतून कारवाईची मागणी केली आहे.
चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यात हा गंभीर प्रकार घडला आहे. बोढे भाजपाचे पदाधिकारी आहेत. राजकीय पाठबळ असलेल्या बोढे यांच्यावर अद्याप कुठलीच कार्यवाही झालेली नाही. या प्रकाराकडे जिल्हाचे लक्ष लागले आहे.




























































