क्रूर घटना…! उधार दिलेले पैसे परत मागायला गेलेल्या तरूणाला पाठीला दगड बांधून विहीरीत फेकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैशाच्या व्यवहारातून सुरू झालेल्या वादातून चंद्रपूर जिल्ह्यात एक अत्यंत क्रूर घटना घडली आहे. एका तरूणाच्या पाठीवर भला मोठा दगड बांधून त्याला विहीरीत फेकण्यात आले. यात त्या तरूणाचा दुर्देवी मृत्यू झाला. प्रविण घिवे असे मृतकाचे नाव आहे. या घटनेने चंद्रपूर जिल्हा हादरला आहे.

मोरवा गावात राहणाऱ्या प्रवीण घिवे या युवकासोबत गावातील काही युवकांनी पैशावरून वाद घातला. त्यानंतर सदर वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. युवकांनी मिळून प्रवीणला मारहाण केली. मात्र ते युवक इथवर थांबले नाही. त्यांनी प्रवीणच्या पाठीला दगड बांधत त्याला विहिरीत फेकून दिले. या घटनेत प्रविणचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पडोली पोलीस घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी मृतदेह विहिरीबाहेर काढत पंचनामा केला. पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तपासाची चक्रे फिरवली असता या हत्ये प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मृतक प्रवीण यांच्याकडून मारेकरी युवकांनी काही पैसे उसने घेतले होते. ते पैसे परत मागायला गेलेल्या प्रवीणचा त्या मारेकऱ्यांनी काटा काढल्याचे बोलले जात आहे. इतर आरोपींचा या प्रकरणी शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.