लोकसभेत एक लाख कोटी रुपयांच्या कंत्राटावरून घमासान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी ‘राफेल डील’च्या मुद्द्यावर काँग्रेसचे आक्रमण थोपवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी लोकसभेत खिंड लढवली. त्यावेळी ‘राफेल डील’मधून बाहेर काढण्यात आलेल्या ‘एचएएल’ या डबघाईला आलेल्या कंपनीला सावरण्याचा प्रयत्न काँग्रेस सरकारने कधीही केला नाही, असा प्रतिहल्ला त्यांनी केला. इकतेच नव्हे तर त्या कंपनीला कंत्राटे देऊन मोदी सरकारच कसे जगवत आहे, हे जोरकसपणे सांगण्याचा प्रयत्न संरक्षणमंत्र्यांनी केला. 83 एलसीए तेजस लढाऊ विमानांच्या निर्मितीसहित 1 लाख कोटींची कंत्राटे त्या कंपनीला मिळण्याच्या मार्गावर आहेत, असे त्यांनी सांगितले. सीतारामन यांच्या त्या दाव्यावरही काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘ट्विटर’वरून प्रश्नचिन्ह उमटवले. त्यामुळे ‘तेजस’ या लढाऊ विमानांच्या स्वदेशी निर्मितीवरूनही घमासान सुरू झाले आहे.

संरक्षणमंत्र्यांचा लोकसभेतील दावा ‘झूठ’
राफेल घोटाळयात पंतप्रधानांना वाचवण्यासाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेतही खोटे बोलल्या आहेत. ‘एचएएल’ कंपनीला मोदी सरकारने ‘तेजस’ लढाऊ विमानांच्या निर्मितीसहित 1 लाख कोटी रुपयांची कंत्राटे दिली, हा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी भर लोकसभेत केलेला दावा ‘झूठ’ आहे, असा हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी चढवला आहे.

राहुल गांधी हे तेवढय़ावरच थांबले नाहीत. ‘एचएएल’ कंपनीला कंत्राटे दिल्याचा दस्तावेज संरक्षणमंत्र्यांनी लोकसभेत पेश करावा. अन्यथा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे आव्हानच राहुल गांधी यांनी ‘ट्विटर’वरून दिले आहे. यासंदर्भात एक इंग्रजी वृत्तपत्रात रविवारी प्रसिद्ध झालेल्या एक वृत्ताचा हवाला त्यांनी दिला आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट खोटी सांगून टाकता, तेव्हा ती लबाडी लपवण्यासाठी नंतर अनेकदा खोटे बोलण्याची वेळ येतेच येते. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबतीत तेच घडले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत उल्लेख केलेल्या कंत्राटाची ‘ऑर्डर्स’ केंद्र सरकारकडून ‘एचएएल’ कंपनीला अद्यापि मिळालेलीच नाही, असे त्या वृत्तात म्हटले आहे. केंद्र सरकारकडून आमच्या सरकारी कंपनीला एकाही कंत्राटाची ऑर्डर वा कंत्राटापोटी एक रुपयासुद्धा मिळालेला नाही. आमची ‘ऑर्डर बुक्स’ तुम्ही तपासू शकता, असे ‘एचएएल’च्या एका उच्च पदस्थ अधिकाऱयाने नाव न छापण्याच्या अटीवर त्या वृत्तपत्राला सांगितले आहे. त्या वृत्ताच्या आधारे राहुल गांधी यांनी संरक्षणमंत्री सीतारामन यांच्यावर ट्विटरवरून हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष दिशाभूल करतात हे लाजिरवाणे
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जनतेची दिशाभूल करणारे आरोप केले आहेत. ते लोकसभेत येऊन देशाची माफी मागतील काय? लोकसभेत खोटे बोलल्याचा आरोप माझ्यावर राहुल गांधी यांनी वर्तमानपत्रातील ज्या बातमीच्या आधारे केला आहे ती बातमी तरी त्यांनी नीट वाचली पाहिजे, असा टोला लगावतानाच काँग्रेसचे अध्यक्ष दिशाभूल करतात हे लाजिरवाणे आहे, असा प्रतिहल्ला संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे.

एचएएल कंपनीला देण्याच्या कंत्राटाच्या ऑर्डर्सवर सह्यासुद्धा झाल्यात, असा दावा संरक्षणमंत्री सीतारामन यांनी कुठे केलेला नाही, हे लोकसभेतील कामकाजाच्या रेकॉर्डवरून स्पष्ट होत आहे. 1 लाख कोटींची कंत्राटे ‘एचएएल’ कंपनीला देण्याच्या दिशेने काम सुरू आहे, एवढेच त्यांनी म्हटलेय, असे त्या बातमीतच नमूद आहे, याकडे सरंक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे.

83 एलसीए तेजस लढाऊ विमाने (5 हजार कोटी), 15 कॉम्बेट हेलिकॉप्टर्स (3 हजार कोटी), 200 हेलिकॉप्टर्स (20 हजार कोटी), 19 डोर्नियर ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट (3 हजार 400 कोटी), हेलिकॉप्टर (15 हजार कोटी), एअरो इंजिन्स (8 हजार 400 कोटी) ही सारी कंत्राटे 1 लाख कोटीपर्यंत जातात. ही कंत्राटे ‘एचएएल’ कंपनीला मिळण्याच्या मार्गावर आहेत. आपण हीच माहिती लोकसभेत दिली असून त्याचा उल्लेख राहुल गांधी हे हवाला देत असलेल्या बातमीतच ठळकपणे केलेला आहे, असे सीतारामन यांनी ट्विटरवर म्हटले आहे.