महिला बनून तरुणाला जाळ्यात ओढले, लग्नाचे स्वप्न दाखवून 20 लाख घेतले

चेन्नईच्या नुंगमबक्कममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने महिला बनून तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्नाचे स्वप्न दाखवत 20 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नुंगमबक्कममध्ये पोलिसांनी 49 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुझुथिवाक्कम येथे राहणारे 39 वर्षीय तक्रारदार बी.रघुराम नुंगमबक्कममध्ये एका खासगी फर्ममध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. रघुरामचे वडिल बालासुब्रमण्यन आपल्या मुलाच्या लग्नासाठी मुलीच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी कल्याणरमण नावाच्या व्यक्तीशी संपर्क केला. त्यांनी या लग्नासाठी त्यांची भाची ऐश्वर्याबाबत सांगितले आणि दोन्ही कुटुंबात लग्नाबाबत बोलणी झाली.

त्यानंतर रघुरामला ऐश्वर्या बोलत असल्याचा एक फोन आला. त्यात तिने तिच्या आईची तब्येत बिघडली आहे आणि 8 हजार रुपयांची गरज असल्याचे सांगितले. रघुरामने विश्वास ठेवून एका डिजिटल वॉलेटच्या मदतीने पैसे ट्रान्सफर केले आणि पुढे टप्प्याटप्प्याने 20 लाख रुपये पाठवले. रघुरामने सांगितले की, जेव्हा जेव्हा त्याने आरोपी कल्याणरामन म्हणजेच ऐश्वर्याला लग्नाबद्दल विचारले तेव्हा ती टाळाटाळ करू लागली. तसेच पैसे परत करण्यास नकार दिला. त्यावेळी रघुरामला संशय आला आणि त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.

रघुरामच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता कळले की, कल्याणरमण आणि ऐश्वर्या दोन्ही एकच आहेत. कल्याणरमण ऐश्वर्या बनून रघुरामची फसवणूक करत होता. आरोपीचे खरे नाव चिन्ना तिरुपती आहे. तो एवढे दिवस मुलीच्या आवाज काढून रघुरामशी बोलून त्याची फसवणूक करत होता. आरोपी हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होता आणि त्याने ऑनलाईन गेम्सवर त्याने पैसे खर्च केले होते.