धनदांडग्यांना हाताशी धरून मोदी देश लुटायला निघालेत, भुजबळांची फटकेबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । महाड

ज्या अनिल अंबानींनी साधे खेळण्यातले विमान कधी बनवले नाही त्या अंबानींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संरक्षणासाठी वापरले जाणारे लढाऊ राफेल विमान बनवण्याचे कंत्राट बहाल केले. हे अत्यंत गंभीर आहे. नोटाबंदी, महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे मोदींनी आत्मविश्वासाने दिलेले आश्वासन तर फेल गेलेच, पण त्यांचे शेवटचे राफेलही फेल गेले अशी जोरदार फटकेबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली.

राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादीची आजपासून राज्यव्यापी निर्धार यात्रा सुरू झाली. यावेळी पक्षाच्या जाहीर मेळाव्यात बोलताना भुजबळांनी शेरोशायरी आणि पंतप्रधान मोदींची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली. ‘एक चाय बेचनेवाला प्रधानमंत्री देश बेचने निकला है’, असा टोला हाणत भुजबळ म्हणाले, नाशिकसारख्या ठिकाणी विमाने बनवण्याचा कारखाना असताना राफेल विमान बनवण्याचे काम त्या कारखान्याला दिले गेले नाही. या कारखान्याने आजवर अनेक लढाऊ व खासगी प्रवासी विमाने बनवली आहेत. या अनुभवी कारखान्याला राफेल बनवण्याचे काम दिले नाही. ही शोकांतिका आहे आणि हा निर्णय देशाला आणखीनच देशोधडीला लावणारे आहे. यावरूनच मोदी धनदांडग्यांना हाताशी धरून देश लुटायला निघाले आहेत हे सिद्ध झाले, असा आरोपच भुजबळ यांनी केला.

भ्रष्टाचाराविरोधात बोलाल तर तुमचा भुजबळ होईल
राज्याचा बांधकाममंत्री असताना मी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधले. पण भाजपच्या राज्यात त्यांच्यावर टीका केली म्हणून माझी बोलती बंद करण्यासाठी माझ्यावर महाराष्ट्र सदनात साडेआठशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठेवून मला जेलमध्ये डांबले. शंभर कोटींचे काम इथे साडेआठशे कोटींचा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो, असा सवाल करतानाच तुम्ही जास्त बोलाल तर तुमचाही छगन भुजबळ होईल, असा सूचक इशाराही भुजबळ यांनी दिला.