छत्रपतींचा अवमान प्रकरण; राज्यपालांसंदर्भातील निर्णयात भाजपने हात झटकले, चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात ‘आम्हाला अधिकार नाही’

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधान केल्यानंतर राज्यपालांविरुद्ध जनतेत संताप आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने त्याविरोधात कोणतेही पाऊल उचलले नसल्याने असे करणे म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा केल्यावर त्यांनी हात झटकले आहेत. ‘राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन अनेक वर्षे महाराष्ट्रात काम केलं. त्या दिवशी त्यांची चूक झाली. त्यांना ठेवायचं की नाही हा अधिकार आम्हाला नाही. ज्यांना अधिकार आहे ते निर्णय घेतील’, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. नागपूर येथे ते माध्यमांशी बोलत होते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या विधानावरून वातावरण तापले आहे. प्रतापगडावर आज शिवप्रताप दिन साजरा केला जात आहे. मात्र यावेळी खासदार उदयनराजे यांनी राज्यपालांविरुद्धच्या नाराजीमुळे या सोहळ्याला जाणं टाळलं.

उदयनराजेंबाबत बावनकुळे म्हणाले की, ‘उदयनराजे असो किंवा आम्ही… आमची सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही. मात्र, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना ठेवायचे की नाही हा आमचा अधिकार नाही. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन अनेक वर्षे महाराष्ट्रात काम केलं. त्यादिवशी त्यांची चूक झाली आहे. त्यांना ठेवायचे की नाही ठेवायचे हा आमचा अधिकार नाही. ज्यांना अधिकार आहे ते निर्णय घेतील.’