सेन्सॉर बोर्डावर इतिहासकारांची समिती नेमणं गरजेचं, छत्रपती संभाजीराजेंचं आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐतिहासिक चित्रपटांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करून इतिहासाची मोडतोड करण्यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. अशा चित्रपटांना सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यासाठी बोर्डावर इतिहासकारांची समिती नेमणं गरजेचं असल्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

या विषयावर पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, इतिहासाची मोडतोड करून जर चित्रपट दाखवणार असाल तर त्याला माझा वैयक्तिक विरोध आहे. ऐतिहासिक चित्रपट हे यायलाच पाहिजेत त्याबदल काही दुमत नाही, पण सिनेमॅटीक लिबर्टीचा फायदा घेऊन अनेक चित्रपट हे इतिहासाची मोडतोड करून दाखवले जातात. माझी प्रामाणिक भावना आहे, की जो इतिहास दाखवला जातो नवीन पिढीला तोच इतिहास घेऊन नवीन पिढी पुढे जाणार. दुर्दैवाने आताची पिढी पुस्तक वाचत नाहीत. वाचन कमी झालेलं आहे. त्यामुळे पिक्चरमध्ये जे दाखवलं जात तेच खरं मानलं जात. म्हणून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली प्रामुख्याने पाहिलं तर हा हर हर महादेव नावाचा चित्रपटच्या निर्मात्यांच्या मते त्यांना सेन्सॉर बोर्डातर्फे सगळ्या परवानग्या आहेत. सेन्सॉर बोर्डात कोणते इतिहासकार आहेत कल्पना नाही, माझं सरकारला आवाहन आहे, की तुम्ही राज्याच्या इतिहासकारांची समिती नेमणं गरजेच आहे. पहिल स्क्रिनिंग हे महाराष्ट्रात व्हायला पाहिजे, आणि मग पुढच्या स्क्रिनिंगला दिल्लीत जाऊदे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

हर हर महादेव या चित्रपटातील कथानकावरही त्यांनी थेट निशाणा साधला. ते म्हणाले की, इतिहासकार इंद्रजित सावंत संशोधक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेधे देशमुख आणि बांदलामध्ये बकऱ्यावरून वाद दाखवला आहे, जो वाद केव्हाच झालेला नाही. जेधे बांदलांसारख्या मोठ्या घराण्यांनी स्वराज्यासाठी आपलं आयुष्य दिलं, आणि तुम्ही त्यांचे वाद असे दाखवताय, आणि हेच नवीन पिढीने घ्यायचं का? बाजीप्रभु देशपांडे हे देशमुखांचे सेवक होते. ते एक मोठे लढवय्ये होते, म्हणून बाजीप्रभु देशपांडेच्या शौर्यावर कुणी पुरावा मागत नाहित. पण बाजीप्रभुंची लढाई ही शिवाजी महाराजांबरोबर झाली हा कुठला इतिहास आहे? आणि कुठे लिहिलाय? पाटील हा बलात्कारी दाखवला आहे, हे कुठे लिहिलयं असा इतिहास नव्या पिढीने पाहायचा आहे का? जर असा चुकीचा इतिहास दाखवण्यापेक्षा तो न दाखवलेला बरा. नका काढू चित्रपट. महाराष्ट्र शासनाने एक स्वतंत्र इतिहासकारांची समिती स्थापन करायला पाहिजे, त्याचे नियम ठरवले पाहिजेत. आधी महाराष्ट्रात स्क्रिनिंग होऊन मग त्यानंतर क्रेंद्रात स्क्रिनिंग होऊ देत. कारण आम्हाला सेंट्रल कमिटीवर काही विश्वास नाही. तिथे कोण इतिहासकार बसलंय याची आम्हाला कल्पना नाही. माझा विरोध कोणत्याही दिग्दर्शक किंवा निर्मात्यालानसून ऐतिहासिक मोडतोडीला आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.