निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी संभाजीराजेंची माघार, राज्यसभा न लढण्याचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
संभाजीराजे छत्रपती यांनी आज राज्यसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. घोडेबाजार टाळण्यासाठी अपक्ष राज्यसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आता मी मावळ्यांचे स्वराज्य घडवण्यासाठी मोकळा झालो असून पुन्हा एकदा 2009प्रमाणे राज्य पिंजून काढणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.
शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली होती. यासाठी त्यांनी शिवसेनेचे अधिकृत सदस्य म्हणून अर्ज भरावा असे सांगितले होते. मात्र राज्यसभा उमेदवारी अपक्षच लढवणार अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी पत्रकार परिषद घेत संभाजीराजे म्हणाले, मला खासदारकी महत्त्वाची नाही तर स्वाभिमान महत्त्वाचा. अनेक आमदारांचे फोन आलेत की कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवायचीच. पण मला कल्पना आहे की, यात नक्कीच घोडेबाजार होणार. घोडेबाजारासाठी माझी उमेदवारी नाही. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी ही निवडणूक लढणार नाही. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता, पण तो पाळला गेला नाही, असेही ते म्हणाले.

मला राजकीय पक्षाच्या बंधनात अडकायचे नाही

प्रत्येक पक्षाचा राजकीय अजेंडा असतो, जो ते राबवत असतात. शिवसेनेचाही राजकीय अजेंडा आहे, पण मला राजकीय पक्षाच्या बंधनात अडकायचे नाही, असे ते म्हणाले.