भीषण अपघात! भरधाव ट्रकने रिक्षाला उडवले, 7 शाळकरी मुलांचा मृत्यू; चार गंभीर

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यामध्ये (Kanker district) गुरुवार भीषण अपघात झाला. कोरेर चिल्हाटी चौकाजवळ झालेल्या या अपघातामध्ये सात शाळकरी मुलांचा मृत्यू झाला असून चार गंभीर जखमी (7 students killed, 4 injured as auto collides with truck in Chhattisgarh) झाले आहेत. रिक्षाचालक शाळा सुटल्यानंतर मुलांना घेऊन परतत असताना भरधाव वेगातील ट्रकने रिक्षाला जोरदार धडकली. ही धडक एवढी भीषण होती की रिक्षाचा पार चुराडा झाला आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर रिक्षाचालक मुलांना घेऊन परतत होता. याच दरम्यान रिक्षाला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला असून दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच मुलांची रुग्णालयात प्राणज्योत मालवली. रिक्षाचालक आणि चार मुलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel) यांनी ट्विट करुन कांकेर येथे झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. ही बातमी अत्यंत दु:खद आहे. आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. देव कुटुंबीयांना धीर देवो. प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ट्विट त्यांनी केले आहे.