
E20 पेट्रोलबाबत वाहनधारकांमध्ये निर्माण झालेली चिंता दूर करण्यासाठी आणि एकूण इथेनॉलचा वापर कमी करण्यासाठी सरकारने पेट्रोल पंपांवर पुन्हा कमी प्रमाणातील इथेनॉल मिश्रणाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, असे मत हिंदुस्थानचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन यांनी व्यक्त केले आहे. पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले E10 पेट्रोल पुन्हा उपलब्ध करावा अशी सूचना त्यांनी केली आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात नागेश्वरन यांनी ही भूमिका मांडली. या लेखाचे सहलेखक अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागातील सल्लागार आकाश पूजारी आहेत. नागेश्वरन यांच्या मते, पेट्रोल पंपांवर E10 आणि E20 असे दोन्ही पर्याय उपलब्ध केल्यास वाहनधारकांच्या बहुतांश चिंता दूर होतील. तसेच जुन्या वाहनांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्यात आवश्यक बदल करण्यासाठीही वेळ मिळेल.
E20च्या गुणवत्तेबाबत तेल कंपन्यांचा दावा
दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी गेल्या आठवड्यात देशभर E20 पेट्रोलच्या गुणवत्तेची तपासणी केली. या तपासणीत इंधनामध्ये अधिक प्रमाणात आर्द्रता किंवा क्लोराइड मिसळल्याचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे त्यांनी सांगितले. पुरवठा साखळीतील विविध ठिकाणी इंधनाची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार असल्याचेही कंपन्यांनी स्पष्ट केले.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी 14 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या निवेदनात इथेनॉलमध्ये मिसळल्या जाणाऱ्या क्लोराइडच्या प्रमाणासाठी केंद्र सरकारने निश्चित केलेले निकष असल्याचे सांगितले.
रिफायनरी, इथेनॉल निर्मिती केंद्रे, डेपो, टर्मिनल आणि पेट्रोल पंप अशा संपूर्ण पुरवठा साखळीवर नियमित आणि व्यापक तपासणी केली जात असल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे. या तपासण्यांमध्ये इंधनाची गुणवत्ता निर्धारित मर्यादेतच असल्याचे आढळल्याचा दावा त्यांनी केला.
हरदीप पुरींकडून इथेनॉल मिश्रण धोरणाचे समर्थन
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनीही इथेनॉल मिश्रणाच्या धोरणाचे समर्थन केले आहे. या मुद्द्यावरून काही जण विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पेट्रोल पंपांवरील तपासणी अधिक तीव्र करण्यात आली असून त्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आल्याचे पुरी यांनी सांगितले. देशातील 1,07,000 पेट्रोल पंपांपैकी केवळ 4 ठिकाणी काही बाबी आढळल्याचे त्यांनी सांगत, काहीजण परिस्थितीचा संदर्भ चुकीच्या पद्धतीने मांडत असल्याचा दावा केला.




























































