भाजप आणि त्यांच्या पूर्वजांनी कधीही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही, त्यामुळे त्यांनी काँग्रेसला देशभक्ती शिकवू नये – मल्लिकार्जून खरगे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली आहे. “मी पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हा अमित शाह लहान होते आणि आज ते आम्हाला देशभक्ती शिकवत आहेत. भाजप आणि त्यांच्या पूर्वजांनी कधीही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना देशभक्ती शिकवू नये,” असे खरगे यांनी म्हटले.

खरगे यांनी भाजपवर ‘देशविरोधी’ आणि ‘धर्मविरोधी’ असल्याचा आरोप केला. उत्तराखंडमध्ये आपण भाषण केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाषणाचे व्यासपीठ शुद्ध केल्याचा दावा त्यांनी केला. “भाजपला त्यांच्या गुरूंनी हेच शिकवले आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

RSSवर निशाणा साधताना खरगे म्हणाले की, RSSचे लोक इंग्रजांचे गुलाम होते. त्यांनी ना स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला, ना जनतेच्या हितासाठी काम केले. RSSच्या लोकांनी इंग्रजांना पत्रे लिहून आपण त्यांच्या बाजूने असल्याचे सांगितल्याचा दावाही त्यांनी केला.

याउलट, महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यादरम्यान ‘करा किंवा मरा’ असा संदेश दिला होता, असे खरगे यांनी नमूद केले. भाजपचे नेते नेहमीच ‘सत्तेच्या नशेत’ असतात, असा आरोपही त्यांनी केला.

‘भाजपच्या विरोधात मतदान करा’

भाजपची सत्तेची नशा तेव्हाच उतरेल, जेव्हा जनता त्यांच्या विरोधात मतदान करेल, असे आवाहन खरगे यांनी केले. “आजकाल सकाळी टीव्ही सुरू केला की नरेंद्र मोदी दिसतात. लोकांना देवापेक्षा मोदींचे दर्शन जास्त होत आहे,” अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

नोटाबंदीवरून मोदींवर निशाणा

नोटाबंदीमुळे रोजगाराच्या संधी संपल्या आणि देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली, असा आरोप खरगे यांनी केला. देशातील बेरोजगारीसाठी नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. मोदींच्या जवळचे श्रीमंत उद्योगपती देशातील विविध क्षेत्रांवर वर्चस्व मिळवत असल्याचा आरोपही खरगे यांनी केला. “नरेंद्र मोदी आणि अमित शाह मिळून देशाचा सत्यानाश करत आहेत,” असा घणाघात त्यांनी केला.