नाशिकचे खड्डे बुजवण्याची कालमर्यादा सांगा, अन्यथा… संजय राऊत यांचा महापालिका प्रशासनाला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खड्ड्यांनी हैराण झालेल्या नाशिककरांसाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरली. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेनेने नाशिक महापालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, हजारो शिवसैनिक आणि नाशिककर यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोर्चासाठी हजेरी लावली. भगवे झेंडे, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणांनी मोर्चाला सुरुवात झाली. नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला, केंद्रात सत्ता.. राज्यात सत्ता.. मनपात सत्ता.. अजून किती खाणार भत्ता.. असे फलक हातात घेऊन शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते. हा विशाल मोर्चा नाशिक महानगरपालिकेवर धडकला. सारा परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला. या मोर्चाचे शेवटी सभेत रुपांतर झाले. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका करत हल्लाबोल केला. ही रस्त्यावरची शिवसेना आहे. सत्तेत शिवसेना नसली तरी रस्त्यावर शिवसेनेची सत्ता आहे, असे म्हणत खड्डे कधी बुजवणार याची कालमर्यादा द्या अन्यथा तुम्ही आहोत आणि आम्ही आहोत असा खणखणीत इशारा संजय राऊत यांनी दिला.

यावेळी भाषणाची सुरुवात करताना संजय राऊत म्हणाले की, खड्ड्यातून वाट काढत आपण इथपर्यंत पोहोचलात, खड्डे तुटवत इथपर्यंत आलात. ही रस्त्यावरची शिवसेना आहे. रस्त्यावरील शिवसेना डेंजर आहे. या रस्त्यावरील शिवसेनेची परीक्षा बघायची असेल, तर तुम्हाला रस्त्यावर यावे लागेल. समोर जर महापौर, आयुक्त असतील आणि त्यांच्यामध्ये थोडी जरी संवेदना असेल तर व्यासपीठावर येऊन नाशिककरांच्यावतीने आमचे निवेदन घ्यायला हवे, असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हा मोर्चा निघत आहे. आम्ही सत्तेत नसलो तरी जनतेसाठी कर्तव्य भावनेने रस्त्यावर उतरतो. भाजप आणि मिंधे गटाचे नगरसेवक घरात लपून बसले आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. यावेळी संजय राऊत यांनी नाशिकमध्ये खड्ड्यामुळे बळी गेलेल्यांची नावेही वाचून दाखवली आणि हे प्रशासनाने केलेले खून आहेत, अशी टीका केली. एक खून केला तर फाशी होते, यांनी 10-12 खून केले असून जोपर्यंत 302 चा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

दहा-बारा बळी घेता आणि हसत हसत सांगता 5 लाख रुपये दिले. गरीबांच्या जीवाची किंमत 5 लाख रुपये आहे. हे 5 लाख तुमच्याकडेच ठेवा. मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटी, जखमींना 50 लाख रुपये द्यायला हवेत. जे जखमी उपचार घेत आहेत त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. ते आयुष्यभरासाठी बेडवर आहेत. त्यांचे बीलच आता 5-10 लाख रुपये झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये देताय आणि ठेकेदाराकडून कोट्यवधीचे कमीशन खाताय. डुप्लिकेट वर्क ऑर्डर आणि भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न… यांच्या जावयाला दुसऱ्या कंपनीच्या डुप्लिकेट नावाखाली मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. हे एका एका दिवशी 27 कोटी खात असून आपल्या पोरांचे पळी घड्ड्यात जात आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

रस्ते स्विमिंग पूल झाले आहेत. मला एक मोठा खड्डा दिसला. त्या खड्ड्यामध्ये भाजपचे पाच-पाच नगरसेवक एकदम टाकायचे आणि दुसऱ्या छोट्या खड्ड्यात मिंधे गटाचे 50 खोकेवाले नगरसेवक टाकायचे. यांना 50-50 कोटी रुपये आणि जखमींना, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख, 2 लाख आणि एक लाख, असेही संजय राऊत म्हणाले. इराण युद्धामुळे डांबर संपले असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. इराणला, इस्रायलला, अमेरिकेला लढायला तुमच्या फौजा गेल्या होत्या का? ज्यामुळे नाशिगला डांबर मिळत नाहीये. अख्ख्या जगाला, देशाला डांबर मिळतेय, पण नाशिकला नाही. तुम्ही नाशिक दत्तक घेतले होते ना, एकदा बघा काय अवस्था झालीय, असा हल्लाबोल करत संजय राऊत म्हणाले की, हा मोर्चा म्हणजे एक इशारा आहे. जिथे जिथे खड्डे आहेत, त्या त्या भागातील भाजप-मिंधे नगरसेवकांच्या घरावर मोर्चा काढू. रेडा, यमदूत तुमच्या घरात घुसवू. शिवसेनेच्या नादाला लागू नका. आम्ही सत्तेत नसू, पण रस्त्यावर आहोत. रस्त्यावरची शिवसेना डेंजर आहे, असा इशारा दिला. यावेळी आवाज कुणाचा, शिवसेनेचा अशा गगनभेदी घोषणा समोरील गर्दीतून देण्यात आल्या.

संजय राऊत पुढे म्हणाले की, मला आश्चर्य वाटतंय की भाजपचे आमदार आंदोलन खड्ड्यांविरोधात आंदोलन करत आहेत. अरे राजीनामा द्या, आमच्या बरोबर मोर्चात सामील व्हा, एकटे-एकटे कसे आंदोलन करताय? नाशिकची अवस्था अत्यंत गंभीर असून अयोध्येनंतर रामाचे वास्तव्य जिथे होती ती दुसरी अयोध्ये इथे आहे. ज्या भाजपच्या लोकांनी राम मंदिराची दानपेटी लुटली, सीतामाईचे दागिने लुटले त्यांचीच पिल्लावळ येथे आहे आणि रामनगरी लुटत आहेत. ज्यांनी अयोध्येतील रामाला सोडले नाही ते पंचवटीतील रामाला काय सोडणार. यांना सोडायचे नाही. मोर्चा काढून थांबायचे नाही. प्रत्येक नगरसेवकाच्या घरापर्यंत जाऊ, महापौरांना घेराव घालू, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

नाशिक महानगरपालिकेमध्ये केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 15 वाघ आहेत. नाशिककरांच्या बाबती, रस्त्याच्या बाबती, विकासाच्या बाबतीत आमचे म्हणणे तुम्हाला ऐकावे लागेल. जर ऐकले नाही, मनमानी केली तर गेट तोडून आम्ही आतमध्ये येऊ, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. तसेच शिवसेनेचे नगरसेवक आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत. नाशिकचे खड्डे कधी बुजवताहेत याची कालमर्यादा आम्हाला द्या. हवेतले शब्द नको. आम्हाला कालमर्यादा द्या आणि त्यानंतरही खड्डे बुजले नाहीत, तर तुम्ही आहात आणि आम्ही आहोत, असेही संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी कुंभमेळ्याच्या कामांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारावरही हल्ला चढवला. संपूर्ण कुंभमेळा भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. हजारो कोटी रुपये आपापल्या नातेवाईकांना, ठेकेदारांना भ्रष्ट मार्गाने वाटले जात आहेत. सगळे ठेकेदार गुजरातचे असून जामनेरचे सब-कॉन्ट्रॅक्टरही आलेले आहेत. हे सगळे आम्ही काढणार आहोत. ही लढाई संपलेली नाही, ही सुरुवात आहे, असा शंखनादच संजय राऊत यांनी केला.