
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना पदोन्नती मिळाली असून त्यांची नेमणूक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून करण्यात आली आहे. न्यायमूर्ती दत्ता यांच्या पद आणि गोपनीयतेच्या शपथविधीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची संख्या 28 होणार आहे.
कायदेमंत्री किरेन रिजिजू यांनी ट्वीटरवर न्यायमूर्ती दत्ता यांची नेमणूक सर्वोच्च न्यायालयात करत असल्याचं जाहीर केलं आहे. सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायमूर्तींच्या पदांची संख्या 34 आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1965 रोजी झाला आहे. ते यावर्षी वयाची 57 वर्षं पूर्ण करतील आणि सर्वोच्च न्यायालयात ते 8 फेब्रुवारी 2030 पर्यंत कार्यरत राहतील.
देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या निवृत्तीचं वय 65 वर्षं आहे. दत्ता यांच्या नावाची शिफारस गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात यू. यू. लळित यांच्या अध्यक्षतेखालील न्यायवृंदाने केली होती.































































