सावरगाव येथे विहीर कोसळून 15 वर्षांचा बाल मजूर ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

सावरगाव येथील आपल्या मावशीकडे राहत आसलेल्या गोवर्धन विठ्ठल गंडे या पंधरा वर्षीय बाल मजूराच्या डोक्यावर विहीरीची दरड कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी जामखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

गोवर्धन विठ्ठल गंडे ( वय १५ ) रा. चोरपुरी, ता गेवराई, जिल्हा बीड (हल्ली रा. सावरगाव, ता. जामखेड) हा लहाणपणीच त्याची आई मृत्यू पावल्याने तो सावरगाव येथील मावशी व काका लक्ष्मण बाबासाहेब गोरे यांच्या कडे लहानपणापासून राहत होता. सोमवार दि. १८ रोजी सकाळी तो शिऊर जवळील फाळकेवाडी या ठिकाणी कामा निमित्त गेला होता.

संतोष फाळके यांच्या विहीरीचे काम सुरू असतांना गोवर्धन विहीरीत उतरला होता. काम सुरू असतांना विहीरीच्या एका बाजुचा काही भाग त्याच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला असता, त्यास ग्रामस्थांनी तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयत उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मुत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी युवराज खराडे यांनी सांगितले.

विशेष म्हणजे विहीरीत दुसरेही काही कामगार होते परंतु विहीरीचा एका बाजूचा भाग गंडे यांच्या डोक्यावर पडला. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला व दोन्ही पायही फ्रॅक्चर झाले होते. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.