मिरची झाली अधिक तिखट, शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळेना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धुळे

कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. सद्यःस्थितीत आवक कमी असूनही मिरचीला अपेक्षित दर नाही. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱयांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाजार समितीत सध्या येणारी मिरची जिल्हय़ा बाहेरून येत आहे. सद्यस्थितीत सरासरी तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर दिला जात आहे. शेतकऱयांना मात्र तो पाच हजार रुपये हवा अशी शेतकऱयांची मागणी आहे. त्यामुळे शेतकऱयांना तिखट असलेली मिरची अधिक तिखट वाटत आहे.

धुळे-नंदुरबार जिल्हय़ातील अनेक शेतकरी लाल मिरचीचे उत्पन्न घेतात. गेल्या आठवडय़ापासून बाजार समितीत लाल मिरची विक्रीस येण्यास सुरूवात झाली आहे. अपेक्षित प्रमाणात मिरचीची आवक नाही. धुळे जिल्हय़ाबाहेरील शेतकरी लाल मिरची विक्रीस आणत आहेत. आवक कमी आणि मागणी समाधानकारक आहे. मात्र तिला जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर दिला जात आहे. धुळे जिल्हय़ाच्या निरनिराळय़ा भागातून येत्या काही आठवडय़ात लाल मिरचीची आवक सुरू होईल. मिरची उत्पादनासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च येतो. तेव्हा बाजार समितीत मिरचीला किमान पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर हवा अशी अपेक्षा शेतकऱयांची आहे.

धुळे जिल्हय़ातील दोंडाईचा आणि धुळे तालुक्यातील शिरुड येथे मिरचीची मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री होते. याशिवाय धुळे शहरातील मिरचीचा व्यवसाय करणारे अनेक आहेत. बाजार समितीच्या मागील मैदानावर लाल मिरच्या वाळत घालून त्या कालांतराने विकल्या जातात. शेतकऱयांकडून कमी भावात मिरची घेवून ती कोरडी झाल्यानंतर व्यापारी दुप्पट दराने विकतात. तेव्हा शेतकरी ज्यावेळी मिरची बाजार समितीत आणतो त्यावेळी त्याला समाधानकारक दर मिळायला हवा, अशी अपेक्षा शेतकऱयांनी व्यक्त केली.