मोदी सरकार गाढ झोपेत; चीन अरुणाचलमध्ये पूर्ण घुसला, तवांगच्या सीमेवर गावं वसवली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गाढ झोपेत असून, देशाच्या सीमांवर लाल माकड चीनने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. चीन अरुणाचल प्रदेशमध्ये घुसला आहे. तवांग सेक्टरच्या सीमेवर गावं वसवली असल्याचे सॅटेलाईट इमेजमध्ये स्पष्ट झाले आहे.

9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घुसखोरीचा प्रयत्न केला. हिंदुस्थानच्या बहादूर जवानांनी ही घुसखोरी उधळली. या धुमश्चक्रीची माहिती तीन दिवसांनंतर सोमवारी देशाला समजली. ज्या ठिकाणी ही धुमश्चक्री झाली तेथील सॅटेलाईट इमेज समोर आली. त्यात धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. तवांग सीमेनजीक चीनने गावं वसवली आहेत. या डोंगराळ प्रदेशात रस्ते, पाणी अशा सर्व सुविधा चीनने गावांना दिल्या आहेत. सीमेपर्यंत रस्त्यांचे बांधकामही सुरू आहे. चीनच्या सैनिकांची तैनाती मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे अरुणाचलच्या सीमेवर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तवांगमध्ये चीनने घुसखोरीचा प्रयत्न केल्यामुळे देशभरात वातावरण तापले असतानाच संसदेच्या सभागृहात तीव्र पडसाद उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही सभागृहात येऊन निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली. यावेळी गोंधळ उडाला. सरकारने प्रतिसाद न दिल्याने राज्यसभेत विरोधकांनी सभात्याग केला. लोकसभेतही गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत हतकूब करण्यात आले.

हिंदुस्थानी जवान 600 जणांना भिडले; अनेकांना गंभीर जखमा
तवांग सेक्टरमध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक आणि हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांमध्ये चकमक झडल्याच्या वृत्ताला संरक्षण दलाने दुजोरा दिला आहे.
हिंदुस्थानी जवान 600 चिनी सैनिकांशी भिडले. यावेळी चकमकीत चिनी सैनिकच अधिक जखमी झाले.

यापूर्वी अनेकदा संघर्ष
हिंदुस्थान-चीनमधील प्रत्यक्ष ताबारेषा (एलएसी) लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या लगत आहे. यापूर्वी अनेकदा या राज्यांच्या सीमांवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न चीनने केला आहे. अनेकदा दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला आहे.

लडाखच्या गलवान खोऱयात 15 जून 2020 रोजी चिनी सैनिकांनी घुसखोरी केली होती. यावेळी झालेल्या संघर्षात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले. चीनच्या 40 वर सैनिकांचा मृत्यू झाला होता. गलवान संघर्षानंतर द्विपक्षीय चर्चेच्या अनेक फेऱया झाल्या; पण तणाव निवळलेला नाही हे स्पष्ट झाले आहे.

राजीव गांधी फाऊंडेशनचे अनुदान रद्द झाल्याने काँग्रेसची तगमग

चीन एकीकडे घुसखोरी करत असताना या मुद्यावरून काँग्रेस जाणीवपूर्वक गोंधळ घालत असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अजबच तर्क लावला. काँग्रेसप्रणीत राजीव गांधी फाऊंडेशनचे अनुदान रद्द करण्यात आल्यामुळे काँग्रेसची तगमग सुरू आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत यासंदर्भातील प्रश्न पाचव्या क्रमांकावर होता. त्यामुळेच काँग्रेसने जाणीवपूर्वक गोंधळ केला, असा आरोप शहा यांनी केला.

हे सरकार चीनला घाबरते

देशहिताच्या मुद्यावर आम्ही सरकारसोबत आहोत. ही वेळ आपापसांतील उणीदुणी काढण्याची नाही. राजीव गांधी फाऊंडेशनच्या बाबतीत आम्ही दोषी आढळलो तर आम्हाला फाशी द्या, असे प्रतिआव्हान काँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला दिल़े मीडियाने चीनच्या घुसखोरीच्या बातम्या दाखवल्या नसत्या तर सरकारने चीनने घुसखोरी केली हेही मान्य केले नसते. हे सरकार चीनला घाबरते, अशी खरमरीत टीकाही खरगे यांनी केली.

संरक्षणमंत्री म्हणतात, कुणीही गंभीर नाही!

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत निवेदन करताना एकही हिंदुस्थानी जवान गंभीर जखमी झाला नसल्याचे सांगितले. हिंदुस्थानी जवानांनी चिनी सैनिकांना हुसकावून लावले आणि त्यांच्या या कामगिरीचा आम्हाला अभिमान असल्याचे राजनाथ म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष मात्र म्हणतात, 6 गंभीर

संरक्षणमंत्री कुणीही गंभीर जखमी नसल्याचे सांगत असले तरी भाजपच्या अरुणाचल प्रदेशाध्यक्ष तपीर गवो यांनी मात्र हा दावा खोडून काढला आहे. चिन्यांशी झालेल्या झटापटीत 20 हिंदुस्थानी सैनिक जखमी झाले असून त्यातील 6 जण गंभीर आहेत, असे गवो म्हणाले.

पंतप्रधान मोदी काय लपवतायत?

तवांगमध्ये शुक्रवारी चकमक झाली आणि आठ दिवसांनी हे प्रकरण समोर आलं आहे. जखमी सैनिक गुवाहाटीमधील रुग्णालयात उपचार घेत आहेत. सत्य काय आहे हे कळायला मार्ग नाही. गलवानसंबंधी झालं तेच तवांगसंबंधी दिसत आहे. पंतप्रधान, संरक्षणमंत्री काय लपवत आहेत, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. चीनसारखा शत्रू तिन्ही बाजूंनी घुसत आहे. परिस्थिती गंभीर आहे. सरकार राजकारणात गुंतून असल्याने चीन, पाकिस्तान आणि इतर सगळे शत्रू धडका मारत आहेत आणि सरकार गांभीर्याने घेत नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.