दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे माऊंट एल्ब्रूसही ठेंगणे, कृत्रिम पायांनी चित्रसेनने युरोपातील सर्वोच्च शिखर केले सर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एल्ब्रूसवर सोमवारी (दि. 23) हिंदुस्थानने इतिहास घडवला. छत्तीसगड येथील कृत्रिम पायाचा चित्रसेन साहू याने हे शिखर सर करत तिरंगा फडकवला. सोलापूरमधील 360 एक्सप्लोररमार्फत आनंद बनसोडे यांनी या मोहिमेचे नियोजन केले आहे. कृत्रिम पायांच्या व्यक्तीने हे शिखर सर करण्याची हिंदुस्थानातील पहिलीच वेळ आहे.

चित्रसेनने माऊंट एल्ब्रूसवर 17 ऑगस्ट रोजी चढाई करण्यास सुरुवात केली. अनेक आव्हानांचा सामना करत त्याने दि. 23 रोजी हे सर्वोच्च शिखर सर केले.

रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या चित्रसेन याने काही वर्षांपूर्वी गिर्यारोहणाची सुरुवात केली. आफ्रिका व ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखरे सर करून यापूर्वीच त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केलेले आहेत.

आव्हानात्मक माऊंट एल्ब्रूस

रशियामध्ये असलेले युरोपमधील सर्वोच्च शिखर माऊंट एल्ब्रूस या शिखराची उंची 18 हजार 510 फूट असून, काळा समुद्र व कॅस्पियन समुद्राच्या मध्ये हे शिखर वसलेलं आहे. पृथ्वीवरील सर्वांत उंच असलेल्यांपैकी एक हा निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. याचे तापमान उणे 25 डिग्रीपर्यंत जात असते. वर्षभर येणारी सततची सुरू असलेली मोठी वादळे, हाडे गोठवणारी थंडी आदी माऊंट एल्ब्रूस चढाईतील अडचणी आहेत.

360 एक्सप्लोररच्या नावे अनेक विक्रम

360 एक्सप्लोरर हा ग्रुप जगभर साहसी मोहिमांचे आयोजन करत असतो. या गुपच्या नावे गेल्या पाच वर्षांत अनेक विश्वविक्रम आहेत. अतिशय अवघड व आव्हानात्मक मोहिमांचे योग्य नियोजन करण्यात 360 एक्सप्लोररचा हातखंडा असून DPIIT, केंद्र सरकार मार्फत ‘युनिक स्टार्ट-अप’ चे नामांकनही या कंपनीला मिळाले आहे.

दोन्ही पाय कृत्रिम असताना चित्रसेन याने मिळवलेले हे यश प्रत्येक हिंदुस्थानीसाठी अभिमानास्पद आहे. सोलापूरमधील 360 एक्सप्लोररने याचे नियोजन केले याचा खूप जास्त अभिमान वाटत आहे. अनेक शारीरिक व मानसिक अपंग असल्याना 360 एक्सप्लोररमार्फत आशेचा किरण दाखवता येत आहे, याचा आनंद वाटतो.
– आनंद बनसोड, एव्हरेस्टवीर, प्रमुख 360 एक्सप्लोरर.