
देवेंद्र भगत । मुंबई
मुंबईच्या चौपाट्यांवर असणारी लाइफ गार्डची सुरक्षा आता तिपटीने टाईट झाली आहे. गेल्या वर्षी असणार्या 37 लाइफ गार्डची संख्या यावर्षी 93 वर गेली असून राखीव मनुष्यबळासह हा आकडा 120 वर गेला आहे. या लाइफ गार्डच्या कामावर 12 सुपरवायझर्सचीही नजर राहणार आहे. त्यामुळे किनार्यांवरील दुर्घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई अशा सहा चौपाट्यांवर मोठ्या संख्येने मुंबईकर आणि देशविदेशातील पर्यटक येत असतात. मात्र यातील काही पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे अनेक वेळा दुर्घटना घडून जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होण्याचे प्रसंग ओढवतात. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून यावर्षीपासून पहिल्यांदाच गोवा मॉडेल सुरक्षा आणली गेली आहे. यामध्ये ‘मे दृष्टी लाइफ सेव्हिंग प्रा. लि.’च्या माध्यमातून प्रशिक्षित लाइफ गार्ड चौपाट्यांवर तैनात ठेवले जात आहेत.
असे होणार काम
- सहा चौपाट्यांवर प्रत्येकी 12 लाइफ गार्ड गस्त घालताना दिसतील.
- सकाळी 7 ते 3 आणि दुपारी 2 ते रात्री 10 या अशा दोन पाळ्यांमध्ये काम चालेल.
- बुडणार्याला वाचवण्यासाठी लाइफ गार्डकडे लाइफ जॅकेट, रोप, रेस्क्यू ट्युब, रिंग बॉय अशी साधने असतील.
अतिरिक्त मनुष्यबळही तैनात
पालिकेकडे गेल्या वर्षी 11 पर्मनंट तर 26 कंत्राटी असे 37 लाइफ गार्ड होते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून सुरक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळ वाढवण्यासाठी ‘दृष्टी लाइफ सेव्हिंग’च्या माध्यमातून प्रशिक्षित 93 लाइफ गार्ड तैनात ठेवले जाणार आहेत. यामध्ये कोणत्याही वेळी मनुष्यबळाची कमतरता पडू नये यासाठी आणखी उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे एकूण 120 लाइफ गार्ड पालिकेकडे उपलब्ध असतील.


























































