
‘सीआयडी’ मालिकेतील इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स उर्फ अभिनेते दिनेश फडणीस (57) यांचे सोमवारी रात्री मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झाले. अलीकडेच त्यांना कांदिवलीतील तुंगा रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दुपारी दौलतनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
छोटय़ा पडद्यावरील अनेक मालिकांसह सिनेमातदेखील दिनेश फडणीस यांनी काम केले आहे, परंतु ‘सीआयडी’ या मालिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. सीआयडीच्या सुरुवातीपासून या कार्यक्रमासोबत ते जोडले गेले होते. ‘सीआयडी’ या मालिकेत इन्स्पेक्टर दयाची भूमिका साकारणारे अभिनेते दयानंद शेट्टी म्हणाले, ‘दिनेश यांना लिव्हर, हृदय आणि किडनीसंबंधित समस्यांचा सामना करावा लागत होता. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवले होते. ते लवकरच बरे होऊन घरी परततील, अशी आशा आम्हाला होती.


























































