सिटी सेंटर मॉलमधील भीषण आग 38 तासांनी नियंत्रणात, तिसऱ्या दिवशीही कूलिंग ऑपरेशन सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेली भीषण आग तिसऱया दिवशी तब्बल 38 तासांनंतर नियंत्रणात आली आहे. या आगीत मॉलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील सुमारे एक हजारांहून जास्त दुकाने खाक झाली आहेत.

सद्यस्थितीत आग नियंत्रणात आली तरी कूलिंग ऑपरेशन सुरूच असल्याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाकडून देण्यात आली. दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला आवश्यक सूचनाही दिल्या. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झटणाऱया धाडसी जवानांचे कौतुकही केले.

सिटी सेंट्रल मॉलमध्ये गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास दुसऱया मजल्यावर एका मोबाईलच्या दुकानात आगीची ठिणगी पडली. या मॉलमध्ये मोठय़ा प्रमाणावर इलेक्ट्रिक, स्टेशनरी, फर्निचर अशा सामानामुळे आग वेगाने वाढत गेली. काही वेळातच संपूर्ण दुसऱया मजल्यासह तिसरा मजलाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

त्यामुळे गेल्या काही महिन्यांतील सर्वात मोठा लेव्हल – 5 म्हणजेच ‘ब्रिगेड’ फायर कॉल असल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनी अखेर शनिवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले.

आग लागताच मॉलमध्ये असलेल्या काही लोकांनी बाहेर धाव घेतली तर काही जणांना अग्मिशमन दलाने बाहेर काढल्याने या मोठय़ा आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, शॉर्ट सर्पिटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहितीही पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

दिवाळीआधी सर्व मॉलची झाडाझडती

सिटी सेंटर मॉलला लागलेल्या भीषण आगीमुळे पुन्हा एकदा मुंबईतील मोठमोठय़ा मॉलमधील अग्निसुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. यातच लॉकडाऊन खुले झाल्याने आगामी सणासुदीच्या काळात या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाला विचारले असता दिवाळी आधी अग्निमशन दल आणि पालिकेच्या माध्यमातून दिवाळीआधी मुंबईतील सर्व मॉल, मोठी आस्थापने आणि कार्यालयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी करण्यात येणार असून हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दलप्रमुख शशिकांत काळे यांनी दिली.

…‘ते’ 3500 रहिवासी आज घरात येणार

सिटी सेंटर मॉलची आग इतकी भीषण होती की आजूबाजूच्या परिसरात आगीचे प्रचंड लोळ पसरले होते. मॉल जवळच असलेल्या ‘ऑर्किड एन्क्लेव’ या 55 मजली इमारतीमध्ये धुराचे लोळ गेल्याने संपूर्ण इमारतीमधील तब्बल साडेतीन हजार रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

आज आग आटोक्यात आल्यानंतर या रहिवाशांना आपल्या घरात जाण्याची परवानगी अग्निशमन दलाकडून देण्यात आली. मात्र अजूनही कुलिंग ऑपरेशन सुरू असल्यामुळे रविवारीच घरात जाण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आहे.

250 कर्मचारी तीन दिवस अहोरात्र झटले

बेसमेंट, ग्राऊंड प्लस तीन मजल्यांच्या या इमारतीत गुरुवारी रात्री 9च्या सुमारास लागलेली आग भडकतच गेली. त्यामुळे 24 फायर इंजिन, 17 जंबो टँकर, 50 हून जास्त वाहने आणि तब्बल 250 अधिकारी-कर्मचाऱयांनी आग विझवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रोबोटचा वापरही करण्यात आला. घटनेत आग नियंत्रणात आणण्याचे काम करताना अग्निशमन दलाचे पाच जवानही जखमी झाले होते. मात्र त्यांची प्रपृती आता ठीक असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.