
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या दोन गटात हिंसक झडप झाली. दोन्ही गटातील समर्थकांनी एकमेकांवर बॉम्ब फेकले. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली होती. पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. या राड्यात दोन्ही बाजूचे बरेच कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हुगळीच्या आरामबाग परिसरात हा हिंसाचार झाला होता.
तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. अचानक दोन्ही बाजूने एकमेकांवर बॉम्ब फेकण्यास सुरुवात झाली ज्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं होतं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राखीव पोलीस तुकड्या तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हिंसाचारातील एक गट हा माजी आमदार कृष्णा चंद्र यांचा होता तर दुसरा गट हा आरामबाग जिल्ह्याचा युवा अध्यक्ष पलाश रॉय यांचा होता. 21 जुलैला कोलकाता येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शहीद दिवस’ कार्यक्रमाला हजेरी लावून हे गट परतले होते. आरामबाग इथे आल्यानंतर दोन्ही गटात हिंसाचाराला सुरुवात झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण अधिकच रक्तरंजित होऊ लागलं आहे. 7 जुलै रोजी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यासह 3 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात टीएमसीचे स्वपन माझी आणि त्यांचे दोन सहकारी बाईकवरून जात असताना या तिघांची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर हल्लेखोर पळून गेले. पोलिसांना घटनास्थळी गोळ्यांचे रिकामे खोके आणि बॉम्ब सापडले होते.



























































