
सामना प्रतिनिधी । खेड
जनावरांची कत्तल करणाऱ्या समाजकंटकांविरोधात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवर चढवलेल्या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. यावेळी आंदोलकांनी पालिसांची व्हॅनही जाळली आहे. शनिवारी पहाटे पीर लोटे येथे ही घटना घडली.संतप्त जमावाने तहसीलदार आणि डीवायएसपी यांच्या गाड्यांचीही तोडफोड केली आहे. या घटनेमुळे मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक सुमारे पाच तास खोळंबली होती.
या महामार्गानजीकच्या जंगलात जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती चार दिवसांपूर्वी मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाचे आश्वासन दिले होते. तसेच जनावरांचे अवशेष तपासणीसाठी कोल्हापूर येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. या घटनेवर परिसरातील युवकांचे लक्ष होते. शनिवारी पहाटे 3 वाजता संशयित वाहन या ठिकाणी पोहचले. त्यांच्यावर पाळत ठेवणारे युवकही तेथे पोहचले. पकडले जाण्याच्या भीतीने समाजकंटकांनी जनावरांना तेथेच सोडून पळ काढला. घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पहाटे 4 वाजता पीर लोटे महामार्गावर रास्ता रोको केला. खेड पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 7 वाजण्याच्या सुमारास खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर घटनास्थळी पोहचले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली नाही किंवा त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी आंदोलकांना शिवीगाळ करत थेट लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. त्यामुळे निवळत असलेला तणाव वाढला आणि आंदोलकांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. या हल्ल्यात लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे नांदेडकर, पोलीस निरीक्षक अनील गंभीर, पोलीस हवालदार आखाडे, नलावडे यांच्यासह काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलीसांनी घटनास्थळाहून काढता पाय घेतला.
पोलिसांनी अचानक केलेल्या लाठीहल्ल्याने चवताळलेल्या आंदोलकांनी खेड पोलिसांनी व्हॅन पेटवून दिली. नांदेडकर आणि तहसीलदारांच्या गाड्यांची तोडफोड केली. या घटनेत महामार्गावर उभ्या असलेल्या गाड्यांचेही नुकसान झाले. पाच तासानंतर जमाव शांत झाला आणि त्यानंतर या मार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरू झाली. समाजकंटकांविरोधात शांततेत रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना शिवीगाळ करून त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या नांदेडकर यांची चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.






























































