
सामना प्रतिनिधी । नगर
“शहर विकासासाठी राज्यात सर्व शहरे दत्तक घेण्यास तयार आहे. मात्र, दत्तक म्हटल्यावर काहींच्या पोटात दुखले जाते. पण टिकेला घाबरत नाही, चार वर्षात आम्ही काय केले व पंधरा वर्षात तुम्ही काय केले हे समोरासमोर सांगण्याची आमची तयारी आहे. तुम्ही मंचावर या असे” आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच “नगर जिल्ह्याने अनेक दिग्गज नेते दिले. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात हे मंत्री राहिले पण 15 वर्षात यांनी शहराकडे लक्ष दिले नाही. ते तालुक्यापुरतेच मंत्री राहिले” असा आरोप फडणवीस यांनी करुन याची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील असे ते म्हणाले. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गांधी मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले हेाते. या वेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, आमदार सुरजितसिंह ठाकूर, आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहराध्यक्ष दिलीप गांधी, अॅड.अभय अगरकर आदी यावेळी उपस्थित होते.
मी दत्तक शब्द उच्चारला की अनेकांच्या पोटात दुखते.
दत्तक घ्यायला मनगटात ताकद लागते. ४ वर्षातील माझे काम आणि १५ वर्षांचे तुमचे काम, होऊन जाऊ द्या, एकदा तुलना: मुख्यमंत्री @Dev_Fadnavis pic.twitter.com/qvB6AY2W6x— महाराष्ट्र भाजपा (@BJP4Maharashtra) December 7, 2018
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराचा विकास झाला पाहिजे ही भुमिका मांडून गावातून येणारी संख्या शहराकडे झपाट्याने वाढली गेली. त्यामुळे शहरातील अन्न वस्त्र निवार्याच्या मुलभुत गरजा, पुर्ण करण्याच्या दृष्टीकोणातून आम्ही शहरी भागासाठी विशेष निधी दिला. आघाडी सरकारच्या काळामध्ये तो पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत होता मात्र आम्ही तो 24 ते 26 कोटी रुपयांपर्यत तो खर्च केला. शहराला आम्ही विकासाची संधी समजतो, 14 व्या वित्त आयोगातून आम्ही अनेक निधी याकरता दिला आहे. शहर विकास करता शहर दत्तक घेतले तर अनेकांच्या पोटामध्ये दुखते, मात्र, मी त्याची परवा करत नाही, आणि मी कुणाला घाबरतही नाही, आम्ही साडेचार वर्षात जो विकास केला तो शाश्वत आहे. तुम्ही पंधरा वर्षात काय केले. हे एका मंचावर येऊन सांगा” असे आवाहनही त्यांनी केले.
साडेचार वर्षात आम्ही सर्व चित्र बदलू शकत नाही, मात्र प्रामाणिकपणे काम करतो, विकासाचा रस्ता आम्ही तयार करतो व आम्ही करुन दाखवतो ही आमची निती असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नगर शहराला आम्ही अमृत योजना, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अनेक निधी उपलब्ध करुन दिला. तो दिल्यानंतरच मी येथे आलो, आम्ही जो शब्द देतो तो पाळतोच, येथील उड्डाणपुलाचा प्रश्न प्रलंबीत होता, केंद्राचा काही संबंध नसताना मंत्री गडकरी यांनी 250 कोटी रुपये दिले, मात्र जागा हस्तांतरित करण्यासाठी मनपा तयार नव्हती. मी शिर्डीत येऊन 50 कोटी रुपये त्यासाठी देतो असे सांगितले, मात्र या जिल्हयात अनेक दिग्गज नेते झाले. त्यांनी शहर विकासाकडे कधीच लक्ष दिले नाही, ते त्या त्या तालुक्याची मंत्री राहिले असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
कुणाचे भय आणि कुणाचे अभय?
आजच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी भयमुक्ती आम्ही करु असे छातिठोकपणे सांगून मी ही धमकी देत नाही असे ही सांगण्यास त्यानी मागे पुढे पाहिले नाही. मात्र काही दिवसापूर्वीच कोतकर समर्थकांना भाजमध्ये पावन केले. हे कसे काय अशीही चर्चा सभास्थही सुरु होती. मी कायदेशीर वागतो बेकायदेशीर वागला तर सहन केले जाणार नाही असे सांगायला ते विसरले नाही. मात्र, कुणाचे भय आणि कुणाचे अभय हे नगर शहरातील गणित बहुधा मुख्यमंत्र्याना माहित नसावे अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.




























































