मुख्यमंत्री पर्रिकरांनी सादर केला गोव्याचा अर्थसंकल्प, गेल्या वर्षीपेक्षा 14 टक्के वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

गोवा राज्याचा 19 हजार 548 कोटी रुपये खर्चाचा 2019-2020 वर्षांसाठीचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी विधानसभेत सादर केला. गेल्या वर्षी देखील अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अमेरिकेतील उपचार मध्येच थांबवून विधानसभेत येत पर्रिकर यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्थसंकल्पाचा आकार 14.16 टक्क्यांनी वाढला आहे. 1200 कोटी रुपयांची वित्तीय तूट असली तरी, 455.10 कोटी रुपयांचा हा शिलकी अर्थसंकल्प आहे.

अर्थसंकल्प बुधवारी दुपारी अडीच वाजता सादर होणार होता. मात्र सकाळच्या सत्राला गैर हजर असलेले मुख्यमंत्री बरोबर अडीच वाजता पोहोचू शकले नाही. त्यामुळे सत्ताधारी सदस्य देखील सभागृहात न जाता आपल्या लॉबीमध्ये थांबले, त्यामुळे सभागृहाचे कामकाज 15 मिनिटे स्थगित करावे लागले. मुख्यमंत्री येताच सगळे सत्ताधारी सदस्य सभागृहात आले. मुख्यमंत्री पर्रिकर यांनी सभागृहात आपल्या आसनावर बसूनच साडेपाच मिनिटे अर्थसंकल्प वाचून दाखवला. सभापतींनी मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्प पटलावर सादर करण्यास सांगितला त्यानंतर अर्थसंकल्पाची प्रत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व विधानसभा सदस्यांना दिली जाईल, असे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. प्रथमच आमदारांना आयपॅड तर पत्रकारांना टॅबलेटवर डिजिटलाईज रुपात अर्थसंकल्प दिला गेला आहे.

कृषी, शिक्षण, साधनसुविधा निर्माण, आरोग्य अशा क्षेत्रंवर अर्थसंकल्पातून भर देण्यात आला असल्याचे पर्रिकर यांनी नमूद केले. पर्रिकर यांचे वाचन झाल्यानंतर कामकाज संपले. तत्पूर्वी सगळा अर्थसंकल्प वाचला, असे गृहित धरावे असे सभापतींनी जाहीर केले.

अखेरचा श्वास असेर्पयत मी निष्ठेने गोव्याची सेवा करत राहिन. गोमंतकीयांनी मला खूप प्रेम व आशिर्वाद दिले आहेत. मला जोष व होशही आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली.