कामगारांच्या संसारांच्या होळय़ांवर राजकीय पोळय़ा भाजू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एसटी कर्मचारी गरीब आहेत. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या. त्या गरीब कर्मचाऱयांना चिथावून त्यांच्या संसारांच्या होळय़ांवर राजकीय पोळय़ा भाजू नका’, अशा शब्दांत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावले. त्याचबरोबर सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱयांना केले.

एसटी कर्मचाऱयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन छेडले आहे. भाजप नेते ते आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज त्या विरोधकांचा समाचार घेतला. संपावरून राजकारण करू नका, असे त्यांनी सांगितले.

‘एसटी कर्मचाऱयांनो तुम्ही आमचेच आहात, तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी सरकार मनापासून प्रयत्न करीत आहे. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी काय पावले उचलत आहोत ते उच्च न्यायालयालाही आम्ही सांगितले असून न्यायालयाचेदेखील समाधान झाले आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका,’ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱयांना केले.

कळकळीचे आवाहन

एसटी कर्मचाऱयांच्या मागण्यांसंदर्भात न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केले आहे. आधीच आपण सर्व जण अजूनही कोरोनाशी लढतोय, अशा परिस्थितीत कृपया सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.