धुळे, महाराष्ट्रातील थंड हवेचं नवं ठिकाण!

48
cold-wave

सामना ऑनलाईन । धुळे

बातमीचा मथळा वाचून गोंधळून गेल्यासारखं झालं असेल. पण सध्या सोशल मीडियावर असेच मेसेज फिरू लागले आहेत. यातील गमतीचा भाग सोडला तर या हिवाळ्यात राज्यातील सगळ्यात कमी तापमानाची नोंद धुळे आणि नाशिक जिल्ह्यात झाल्याचे पाहायला मिळते.

एरव्ही कडक उन्हासाठी प्रसिद्ध असलेल्या धुळ्याचे नाव यंदा हुडहुडी भरवणाऱ्या थंडीसाठी घेतले जात आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून या भागात थंडी पुन्हा वाढली आहे. बुधवारी पहाटे धुळ्यात 3.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळेच ‘धुळे! महाराष्ट्रातील थंड हवेचं नवं ठिकाण’ असे मेसेज आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये पारा 5 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याचे पाहायला मिळाले आहे. या निफाडमध्ये देखील गेल्या काही वर्षांपासून थंडीचे प्रमाण वाढल्याचे नोंदवण्यात आले आहे.

वाढत्या थंडीमुळे उकाड्यापासून सुटका झाली असली तरी नाशिकमधील द्राक्ष शेतीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक द्राक्ष बागायतदारांनी शेकोटी करून पारंपारिक पद्धतीने द्राक्षांच्या मळ्यात तापमान सामान्य राखण्याचा प्रयत्न केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या