
मुंबई पोलीस दलाच्या कमांडोने कल्याणमध्ये जिगरबाज कामगिरी करत आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या सहाजणांचे प्राण वाचवले. दीपक घरत असे या अंमलदाराचे नाव असून मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी घरत यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
पोलीस नाईक असलेले दीपक घरत हे मंगळवारी सायंकाळी मुलाला दुचाकीवरून शाळेतून घरी घेऊन जात होते. त्यावेळी रस्त्याला लागून असलेल्या सर्वोदय हाइट्स या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीला आग लागल्याचे त्यांच्या नजरेस पडले. लोक मदतीचा हात देण्याऐवजी आपल्या मोबाईलमध्ये आगीचे चित्रीकरण करत होते. अशा वेळी दीपक यांनी कुठलाही विचार न करता मदतीसाठी धावले. रंगकाम करण्यासाठी इमारतीला बांधलेल्या परांचीवरून ते पहिल्या मजल्यावरील त्या घरात घुसले. घरत यांना पाहून दोन नागरिकदेखील त्यांच्या सोबतीला सरसावले. मग तिघांनी मिळून आगीत सापडलेल्या सहा जणांना सुखरूप बाहेर काढून त्यांना इमारतीखाली आणले. त्यात चार महिला, एक वृद्ध आणि एका ताह्या बाळाचा समावेश आहे. हे सर्व इमारतीखाली आल्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले, पण दीपक यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सहा जणांचे प्राण वाचले.
पोलीस आयुक्तांकडून कौतुकाची थाप
आपली हद्द नसताना, त्यात साप्ताहिक सुट्टी असतानाही त्याचा विचार न करता मुंबई पोलीस ऑनडय़ुटी 24 या भावनेने आणि नागरिकांची सुरक्षा हे कर्तव्य लक्षात ठेवून घरत यांनी काम केल्याचे सांगत मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दीपक घरत यांना पाच हजार रुपये रोख व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.