फक्त 30 कर्मचारी करतात ‘समृद्धी’ महामार्गावर वाहतूक नियमन; अपघातांवर नियंत्रण कसे मिळवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूर ते मुंबई 710 किलोमीटर आठपदरी समृद्धी महामार्गाावर अपघातांचे प्रमाण वाढले असून अल्पावधीतच अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक नियमन आणि अपघात रोखण्याचे मोठे आव्हान आहे. आता अमानी महामार्ग पोलीस केंद्राकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात रोखणे, वाहतूक नियमन आणि कारवायांचीदेखील जबाबदारी देण्यात आली. मात्र, त्यांच्याकडे मनुष्यबळ अपुरे असल्याने या मार्गावरील अपघात कसे रोखणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

अमानी महामार्ग पोलीस केंद्राकडे जेमतेम 28 कर्मचारी व दोन अधिकारी असे अपुरे मनुष्यबळ आहे. असे असतानाही त्यांच्याकडेच आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात रोखणे, वाहतूक नियमन आणि कारवायांचीदेखील जबाबदारी देण्यात आली. यवतमाळचे इंटरसेप्टर वाहन त्यांच्या दिमतीला आहे. मात्र पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी 97 किलोमीटरच्या विस्तृत रस्त्यावर कारवायांची गती मंदावली असून अपघातांवर नियंत्रण कसे मिळविले जाणार, हा मोठा प्रश्न आहे.

समृद्धी महामार्गावर ‘राइट लेन’चा वापर कधी करायला हवा, ‘हाय-वे हिप्नोसिस’ म्हणजे काय, वेगाचे उल्लंघन केल्यास काय परिणाम होऊ शकतो आदी प्रश्नांची उत्तरे न मिळविताच या महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे. वाहतूक नियमन, जनजागृती आणि कारवाई करण्यासाठी महामार्गावर स्वतंत्र यंत्रणेची अद्याप नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी जनजागृतीची गरज व्यक्त होत आहे.