
काळाचौकी येथील अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाचे काम रखडल्याने इमारतींची दुरवस्था आहे. जीर्ण झालेल्या इमारती कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची भीती आहे. या इमारतीच्या पुनर्विकासासाठी निविदा काढण्याचा निर्णय झाला आहे, पण अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. रहिवाशांमधील असंतोष लक्षात घेऊन अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाच्या कामाला त्वरित सुरुवात करावी, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अजय चौधरी यांनी आज विधानसभेत केली.
औचित्याच्या मुद्दय़ावर बोलताना त्यांनी अभ्युदय नगर व भोईवाडय़ातील पुनर्विकासाकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले की काळाचौकीला 1956पासून 33 एकर जागेवर अभ्युदय नगर उभे आहे. 49 इमारती जीर्ण होऊन त्यांची दुरवस्था झाली आहे. म्हाडाकडून 2005 पासून इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया रखडली आहे. या इमारतींमधील रहिवाशांमध्ये असुरक्षिततेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हाडा प्राधिकरण व गृहनिर्माणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पुनर्विकासासाठी निविदा काढण्याचा निर्णय झाला होता, पण अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पुनर्विकासाबाबत रहिवाशांना विश्वासात घेतलेले नाही. रहिवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. सरकारने पुनर्विकासाबाबत तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.
स्वप्नपूर्तीचा पुनर्विकास रखडला
भोईवाडय़ातील स्वप्नपूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेची मालमत्ता मुंबई महापालिकेची आहे. त्याचाही पुनर्विकास रखडला आहे. महापालिकेने विघ्नहर्ता डेव्हलपर्सला पुन्हा पुनर्विकास करण्याची परवानगी दिली आहे. महापालिकेने घेतलेला निर्णय अंतिम मंजुरीसाठी नगरविकासाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही अजय चौधरी यांनी केली.





























































