
श्वास जितका संयत असेल तितकी आयुर्मानाची मर्यादा जास्त असलेली निसर्गात दिसून येते. आधी सांगितल्याप्रमाणे मनुष्यात श्वासोच्छ्वासाचा वेग हा मिनिटाला पंधरा श्वास इतका असतो आणि मनुष्याचे आयुर्मान साधारणतः 80 ते 100 वर्षे असते. श्वान, वाघ, सिंह अशा चतुष्पाद प्राण्यांमध्ये श्वासोच्छ्वासाची गती मिनिटाला 25 पेक्षा जास्त असते आणि त्यांची आयुर्मर्यादा वीस वर्षांपर्यंत सीमित होते. कासव मिनिटाला केवळ पाच वेळा श्वसन करते आणि त्याचे आयुर्मान किमान दीडशे वर्षे किंवा त्याहीपेक्षा अधिक असू शकते, पण प्राणायामाचे उद्दिष्ट हे दीर्घायुष्य नसून उत्तम आरोग्य आणि मनशांती आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
आपल्या श्वासोच्छ्वासावरती अनेक शारीरिक आणि मानसिक क्रिया अवलंबून असतात. प्राणायाम म्हणजेच नियंत्रित किंवा संयत श्वासोच्छ्वासाने आपण या क्रियांना नियमित करून आरोग्य प्राप्ती करून घेऊ शकतो.
प्राणायामाची परिभाषा
प्राणायाम संदर्भात वापरल्या जाणाऱया काही विशेष शब्दावलीची आपण आता ओळख करून घेऊ.
पूरक – पूरक म्हणजे श्वास आत भरण्याची क्रिया.
रेचक – रेचक म्हणजे उच्छ्वासाची क्रिया.
कुंभक – कुंभक म्हणजे श्वास रोखून धरण्याची क्रिया. कुंभक हा तीन प्रकारचा असू शकतो.
आंतर कुंभक किंवा अभ्यंतर कुंभक – श्वास भरून तो आतच रोखून ठेवण्याच्या क्रियेला आंतर कुंभक म्हणतात. याचे अनेक प्रकार आहेत. तथापि, त्यातील आठ प्राणायाम हे अधिक प्रचलित असल्याने त्यांना अष्टकुंभक म्हणून ओळखले जाते. यातील काही प्राणायाम कसे करावेत याचे मार्गदर्शन पुढील लेखांमधून अवश्य केले जाईल.
बाह्यकुंभक – उच्छ्वास करून काही वेळ श्वास बाहेरच रोखून ठेवण्याच्या प्राणायामाला बाह्यकुंभक म्हणतात. यामध्ये बाह्य प्राणायाम, अग्निसार आणि नौली हे प्रकार येतात.
केवल कुंभक – जर मन निर्विचार होऊ शकले तर काही क्षणापर्यंत आपला श्वासोच्छ्वासही स्थिर होतो. सिद्ध योगी अशा स्थितीपर्यंत जाऊ शकतात असे म्हटले जाते.
प्राणायाम आणि बंध
बंध – कुठलाही कुंभकयुक्त प्राणायाम करताना श्वास रोखून ठेवण्यास आणखी काही क्रिया आपल्याला कराव्या लागतात. या क्रियांना योगाच्या परिभाषेत बंध असे म्हटले आहे. यातील सर्वात पहिला बंध म्हणजे,
जालंधर बंध – आपली मान खाली घालून आपली हनुवटी छातीच्या वरच्या खळग्यात लावून धरणे म्हणजे जालंधर बंध हा बंध केल्याने मानेच्या नसा ताणल्या जातात आणि गळय़ातील विभिन्न ग्रंथींवर दबाव पडतो. आपल्या गळय़ामध्ये लाळ ग्रंथी आणि थायरॉईड ग्रंथी असतात. या ग्रंथींवर दबाव पडल्याने त्यांना व्यायाम मिळून त्यातून पाझरणारी द्रव्ये शरीराला योग्य प्रमाणात मिळतात. गळय़ामध्ये विशुद्ध-चक्र असते. या चक्राचा प्रभाव आपल्या शरीरातील सांध्यांवर असतो. जालंधर बंद केल्याने आपल्या गळय़ातून जाणाऱया श्वसनलिकेवरती अवरोध उत्पन्न होतो आणि श्वास रोखून ठेवण्यास आपल्याला सहाय्यता मिळते. अभिजित अभिजित कुळकर्णी





























































