
बहुचर्चित राफेल करारावरून काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारचे पितळ उघडे पाडले आहे. केंद्र सरकार आणि राफेल बनवणारी फ्रेंच कंपनी दसाँ एव्हिएशनमध्ये झालेल्या राफेल करारात तब्बल 21 हजार 75 कोटींचा महाघोटाळा झाला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
फ्रान्समधील ‘मीडियापार्ट’ या मीडिया पोर्टलने राफेल करार गैरव्यवहाराबाबत खळबळजनक दावे केले आहेत. त्या अनुषंगाने सुरजेवाला यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रे सादर करीत मोदी सरकारवर निशाणा साधला. 2015 मध्ये 36 राफेलचा करार 5.06 बिलियन युरोमध्ये निश्चित झाला होता. यात शस्त्रास्त्रांचाही समावेश होता. इंडियन नेगोशिएशन टीमने ही किंमत ठरवली होती. असे असताना दसाँ एव्हिएशनने 20 जानेवारी 2016 रोजी अंतर्गत बैठक घेऊन त्यात 36 राफेलची किंमत 7.87 बिलियन निश्चित केली. मोदी सरकारने 23 सप्टेंबर 2016 रोजी दसाँ एव्हिएशनने ठरवलेल्या किमतीवर व्यवहार मान्य केला. संरक्षण मंत्रालयाने मनाई करूनही 21,075 कोटींहून अधिक रुपयांचा राफेल करार करण्यामागे नेमके कुठले कारण होते, असा सवाल सुरजेवाला यांनी केला आहे.
मध्यस्थापर्यंत गोपनीय कागदपत्रे पोचलीच कशी?
26 मार्च 2019 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मध्यस्थाकडून एक गोपनीय कागदपत्र जप्त केले होते. या मध्यस्थापर्यंत गोपनीय कागदपत्रे पोचलीच कशी? याची कुठलीही चौकशी करण्यात आली नाही. करारात लाच, गिफ्ट, कमिशन, मध्यस्थी यांच्यावर बंदीची अट का घातली नाही, असाही प्रश्न सुरजेवाला यांनी केला.
भाजपने करारातून काही अटी हटकल्या
केंद्रात काँग्रेस आघाडीचे सरकार होते त्यावेळी राफेल करारात भ्रष्टाचारविरोधी नियम लागू होते, परंतु नंतर मोदी सरकारच्या कालावधीत हे नियम हटवण्यात आले. एका व्यावसायायिकाच्या फायद्यासाठी राफेल करारातून हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला बाहेर काढण्यात आले, असा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना 3 प्रश्नांची उत्तरे विचारावीत – राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची आठवण करून देत पंतप्रधानांना तीन प्रश्न विचारा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्रिय विद्यार्थी, पंतप्रधान म्हणतात की आम्ही न घाबरता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. तुम्ही त्यांना सांगा की माझ्या 3 प्रश्नांची उत्तरे न घाबरता द्या, असे ट्विट राहुल यांनी केले. राफेल करार घोटाळ्यात कुणी पैसे घेतले? करारातील भ्रष्टाचारविरोधी क्लॉज कोणी हटवला? संरक्षण मंत्रालयाच्या प्रमुख कागदपत्रांपर्यंत मध्यस्थाला कोणी पोचवले? असे तीन प्रश्न राहुल यांनी केले आहेत.




























































