काँग्रेसचा ‘ईडी’ कार्यालयावर मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रातील भाजपचे सरकार मनमानी व अहंकारी असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना कधीही घाबरला नाही व घाबरणारही नाही. भाजपच्या या हुकूमशाहीला काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या मार्गाने चोख उत्तर देईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितले.

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीची नोटीस पाठवून दडपशाही करणाऱया केंद्र सरकारविरोधात काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आला. नागपुरातही ईडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला.

ज्या गांधी कुटुंबाने देशासाठी सर्वस्व अर्पण केले, त्याग केला, बलिदान दिले त्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी खोटय़ा व बनावट प्रकरणात त्यांना अडकवण्याचा भाजपचा कुटील डाव आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमचा आवाज दडपण्याचा भाजप सरकार प्रयत्न करत आहे. पण अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. असे नाना पटोले यावेळी म्हणाले. भाजपच्या दडपशाहीसमोर काँग्रेस झुकली नाही आणि कधी झुकणारही नाही. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी म्हणजे राजकीय सूड असल्याचा आरोप भाई जगताप यांनी केला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून भाजप विरोधकांना नाहक त्रास देत आहे. मोदी सरकार सोनिया आणि राहुल यांना घाबरते म्हणूनच ईडीला पुढे केल्याचे जगताप म्हणाले.

या मोर्चात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.