मोदींच्या मुलाखतीत फक्त ‘मी, माझे, मला’,काँग्रेसची खरमरीत टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi-modi

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या 90 मिनिटांच्या मुलाखतीत फक्त ‘मी… माझे… मला…’ याच्याच आसपास फिरत होते आणि त्यांच्या या ‘मी’मुळेच गेल्या 55 महिन्यांत देशाला बरबादीच्या उंबरठय़ावर नेऊन ठेवले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली. मोदी यांचे आता फक्त शंभर दिवस उरले असून त्यांची उल्टी गिनती सुरू झाली आहे, असा इशाराही काँग्रेसने दिला. पंतप्रधान मोदी यांचे भाषण संपताच काँग्रेसचे प्रवत्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर प्रतिक्रिया दिली. अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर मोदी यांनी काहीच स्पष्ट केले नाही, अशी टीका करतानाच सुरजेवाला यांनी पुढीलप्रमाणे प्रश्न उपस्थित केले…

  • देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15 लाख जमा झाले का?
  • 80 लाख कोटी रुपये काळा पैसा 100 दिवसांत देशात परत आणला का?
  • दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करणार होतात. त्यानुसार 55 महिन्यांत 9 कोटी रोजगार निर्माण झाले? त्यातील 9 लाख तरी निर्माण करू शकलात का?
  • शेतकऱ्यांना झालेल्या खर्चावर 50 टक्के लाभ देणार होतात. पण खर्च तरी दिला का?
  • व्यापार व्यवस्था सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. पण गब्बरसिंग टॅक्स (जीएसटी) लावून धंदा मंदा करून टाकला.
  • नोटाबंदीने काळ्या पैसेवाल्यांची ऐश झाली. लाखो महिलांचे स्त्राrधन खर्च झाले. 120 सामान्य नागरिकांचे नोटा बदलण्याच्या रांगेत जीव गेले.
  • देशात भ्रष्टाचार वाढला आहे. राफेलखरेदी भ्रष्टाचाराची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून का केली जात नाही?
  • राष्ट्राच्या सुरक्षेशी खेळ केला. 55 महिन्यांत दहशतवादग्रस्त भागांत 428 जवान शहीद झाले आणि 276 नागरिक मारले गेले. नक्षलग्रस्त भागांत 228 जवान शहीद झाले आणि 378 सामान्य नागरिकांचे बळी गेले.
  • गंगा स्वच्छ झाली का? स्वच्छतेसाठी निवडलेल्या 39पैकी 38 ठिकाणी आजही गंगेचे पाणी अस्वच्छ आहे.
  • 100 स्मार्ट सिटी बनवणार होतात. एकही बनलेली नाही.
  • मेक इन इंडियाचे काय झाले?
  • पेट्रोलचे दर लिटरला 68 रुपये झाले. विमानासाठी लागणारे पेट्रोल मात्र 58 रुपये लिटर आहे. हेच का अच्छे दिन?