मुंबई कंट्रोलमध्ये! पण काळजी घ्या! पालिका आयुक्तांचे आवाहन

मुंबईत गेल्या सहा दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या स्थिर असून मृत्यूदराचे प्रमाण गेल्या 70 दिवसांत 0.03 इतके राहिले आहे. मुंबईकरांसाठी ही समाधानाची बाब आहे. मात्र, मुंबईची ही रुग्णसंख्या कंट्रोलमध्ये असली तरी मुंबईकरांनी काळजी घ्यावी आणि कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केले आहे.

राज्यासह मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, मुंबई महापालिकेने कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली असून उल्लंघन करणाऱयांविरोधात दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांत रुग्णांची संख्या सरासरी 8 हजारच्या दरम्यान स्थिर आहे. सोमवारी ही रुग्णसंख्या 8 हजारच्या खाली गेली असून मुंबईत सोमवारी कोरोनाचे 7 हजार 381 रुग्ण आढळले तर आज यात आणखी 167 ने घट होऊन ही संख्या 7 हजार 214 वर पोहोचली आहे.

87 टक्के रुग्ण लक्षणे नसलेले 

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी पालिका रुग्णालयांमध्ये 3 हजार 685 बेड रिकामे असून सध्या उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी 87 टक्के रुग्ण हे लक्षणे नसणारे आहेत तर गेल्या 70 दिवसांत 953 रुग्णांचा मृत्यू झाला. हा मृत्यूदर 0.03 इतका म्हणजे दिवसाला जवळजवळ 13 इतका आहे. हा मृत्यूदर स्थिर असून दिल्ली शहराच्या तुलनेतही कमी असल्याचे चहल यांनी सांगितले.

गेल्या सहा दिवसांतील आकडेवारी

  • मंगळवार 7 हजार 214
  • सोमवार 7 हजार 381
  • रविवार 8 हजार 479
  • शनिवार 8 हजार 834
  • शुक्रवार 8 हजार 839
  • गुरुवार 8 हजार 217
आपली प्रतिक्रिया द्या