नगर, कोल्हापुरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ची घोषणा केली आहे. याअंतर्गत जीवनावश्यक वस्तू वगळता, उर्वरित सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला आहे. नगर शहरातील कापड बाजारातील दुकाने बंद असल्याने मागील वर्षीच्या लॉकडाऊनच्या आठवणी जाग्या झाल्या. कोल्हापुरातही वर्दळीने गजबजलेले रस्ते, चौक ओस पडले होते. सांगलीतील काही भागांत दुकाने सुरू असल्याचे दिसून येत होते.

जीवनावश्यक वस्तू वगळता, संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आल्याने नगरमध्ये मंगळवारी मोठा परिणाम पाहायला मिळाला. मंगळवारी बहुतांश ठिकाणी बंद असताना रस्त्यावर लोकांची गर्दी मात्र कायम होती. काही व्यापाऱ्यांनी व्यापार करण्यास परवानगी देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे, तर काही संघटनांनी निदर्शने केली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी रात्रीपासूनच पोलिसांनी संचारबंदीची अंमलबजावणी सुरू केल्याने नेहमी वर्दळीने गजबजणारे रस्ते, चौक आणि गल्ल्या ओस पडल्या होत्या. बहुतांश सर्वच शासकीय कार्यालयांत अभ्यंगतांना प्रवेश बंद करण्यात आला होता. दरम्यान, सरसकट दुकाने, व्यवसाय बंदला विरोध करण्याचा प्रयत्न केल्याने सकाळी अनेक व्यावसायिकांनी दुकाने सुरूच ठेवली. जिल्हा प्रशासनाशी झालेल्या बैठकीनंतर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या आवाहनानंतर दुपारी तीननंतर मात्र सगळ्यांनी कडकडीत बंद पाळला. आता बुधवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चेत अंतिम निर्णय होणार असून, सगळ्यांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

सांगलीत दुकान सुरू

सांगली शहरातील सर्व व्यवहार सुरू होते. कापड पेठ, मेन रोड, मारुती रोड, सराफ बाजार आदी भागांतील सर्व दुकाने सकाळपासून सुरू होती. बाजारपेठाही नेहमीसारखी गजबजलेली होती. महापालिका प्रशासन अथवा पोलीस रस्त्यांवर दिसून येत नव्हते. सांगलीप्रमाणेच मिरज व इतर मोठय़ा शहरांतही अशीच स्थिती सगळीकडे दिसत होती. याबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत होती.