
शासनाच्या कोरोना प्रतिबंधक नियमांची होणारी पायमल्ली आणि गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या पाहून वडूजमध्ये आजपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. आजपासून 30 एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय नगरपंचायत, पोलीस, महसूल व वैद्यकीय प्रशासनाने घेतला आहे.
गेल्या 15 दिवसांपासून वडूज शहरात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. प्रत्येक दिवशी 15 रुग्णांची वाढ होऊनही काही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. काही निर्बंध असले तरी वडूज शहरामधील बहुतांशी व्यापारी, व्यावसायिक पळवाटा शोधून सर्व निर्बंध पायदळी तुडवत आहेत. तर आसपासच्या गावांतील नागरिकांची वर्दळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपंचायत, महसूल, वैद्यकीय प्रशासन यांनी बैठक घेऊन आजपासून 30 एप्रिलपर्यंत सात दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत आपत्तीजन्य कार्यालय, पेट्रोल पंप (अत्यावश्यक सेवेसाठी), हॉस्पिटल व दूधवाटप सुरू राहणार आहे. बाकी सर्व सेवा बंद राहणार आहेत. यावेळी तहसीलदार किरण जमदाडे, सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, मुख्याधिकारी माधव खांडेकर, वैद्यकीय अधिकारी वैशाली चव्हाण, नगराध्यक्ष सुनील गोडसे, उपनगराध्यक्षा किशोरी पाटील, विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे उपस्थित होते.





























































