पुणे- दोघांपेक्षा जास्त एकत्र आल्यास कारवाई, कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेचा आदेश

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही चार-चौघांसह घराबाहेर पाय ठेवताच महापालिका तुम्हाला जाब विचारणार आहे. अत्यावश्यक काम नसतानाही दोनपेक्षा जास्त व्यक्ती रस्त्यांवर एकत्र दिसल्यास दंडही वसूल केला जाणार आहे. गर्दीला थारा देणाऱ्या दुकानांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिका आणि अन्य यंत्रणा प्रयत्न करत आहे. मात्र, रुग्णसंख्येत वाढच होत चाचली असल्याची बाब महापालिकेने गांभीर्याने घेतली आहे. त्यातून सध्याच्या नियमांच्या अंमलबजावणीवर भर देत, सुरक्षिततेची बंधने पाळली जात आहेत का , यावर लक्ष ठेवत आहेत. सध्याच्या स्थितीत सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य देण्याची गरज असूनही सर्रास त्याकडे कानाडोळा होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोना पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर कठोर उपाय म्हणून एकाच वेळी रस्त्यांवर उतरणाऱ्या नागरिकांसाठीही बंधने घालून सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीला नियंत्रणात आणण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारण वगळता अन्य कामांसाठी दोनपेक्षा अधिक लोकांना एकत्र ये-जा करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय, एखाद्या दुकानासमोर गर्दी करता येणार नाही. तरीही ती झाल्यास दुसानदारांसह नागरिकांवरही दंडात्मक कारवाई होणार आहे.

दुसरीकडे आज घडीला अनेक जण मास्क न वापरताच रस्त्यांवर येत असल्याचे दिसत आहे. अशा लोकांवर सतत कारवाई करूनही परिणाम होत नसल्याने तिची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. यासंदर्भात नवीन नियम ठरवण्यासाठी बैठक घेऊन आदेश काढण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी गुरुवारी सांगितले. महापालिका आयुक्त विक्रमकुमार म्हणाले की कोरोनाच्या वाढीचा वेग पाहता नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेण्याची गरज आहे. मात्र तसे होत नसल्याने आता सार्वजनिक ठिकाणी फिरताना बंधने असतील. ती न पाळणाऱ्यांना वर कारवाई होईल. त्याबाबत शुक्रवारी बैठक होईल आणि तसे आदेश काढण्यात येतील.

आरोग्य विमा उतरवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे 40 लाख पुणेकरांचा आरोग्य विमा उतरवण्याची सूचना महापालिकेतील गटनेत्यांनी प्रशासनाला केली आहे. तसेच खाजगी हॉस्पिटल्स छोटी क्लिनिक आणि अन्य डॉक्टरांना महापालिकेच्या मदतीला घेण्यासाठी पावले उचलावीत अशी सूचनाही करण्यात आली आहे. अशा सूचनांबाबत बैठक घेऊन शक्य तेवढी कार्यवाही करण्यात येईल असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

  • मुंबईमध्ये जमावबंदी जारी करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पुणे शहरामध्ये ती करता येईल का, याबाबत पालकमंत्र्यांबरोबर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे.
  • मुंबई महापालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या जमावबंदीतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली तर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले.
आपली प्रतिक्रिया द्या