
देशातील वाढती कोरोनाची रुग्णसंख्या आणि शेतकऱ्यांच्या मुद्दय़ांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर शरसंधान साधले. केंद्र सरकारचे कोरोनावर नियत्रंण नाही, आवश्यक तेवढय़ा लस नाहीत, रोजगारही नाही, शेतकरी-कष्टकऱ्यांच्या भेटीला वेळ नाही, एमएसएमई सुरक्षित नाही, मध्यमवर्गीयदेखील संतुष्ट नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले. इतकेच नव्हे तर ‘आम खाना ठीक था…मगर आम आदमी को तो छोड देते,’ अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
देशात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यास केंद्र सरकारला अपयश येत असून यावरून विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. काँग्रेसचे नेते-खासदार राहुल गांधी यांनी या मुद्दय़ावर केंद्र सरकारला धारेवर धरले. या मुद्दय़ावरून राहुल गांधी यांनी ट्विट करीत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. अभिनेता अक्षय पुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2019 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीचा संदर्भ घेत राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली.






























































